IND Women vs SA Women Test : भारतीय महिला संघाने चेन्नई कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. शफाली वर्मा ( Shafali Verma ) आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी २९२ धावांची विक्रमी भागीदारी केली. स्मृतीचे दीडशतक १ धावेने हुकले, तर शफालीने विक्रमी द्विशतकी खेळी केली. भारतीय महिला संघाने कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद ५२५ धावा करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला जो महिलाच काय तर एकाही पुरुष संघाला जमलेला नाही.
स्मृतीने १६१ चेंडूंत २७ चौकार व १ षटकारासह १४९ धावा केल्या. ५२व्या षटकात डेलमी टकरने भारताला पहिला धक्का दिला. पण, शफाली कोणाला जुमानत नव्हती आणि तिने द्विशतक झळकावून इतिहास घडवला. कसोटीत क्रिकेटमध्ये मिताली राजनंतर द्विशतक झळकावणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. शफाली १९७ चेंडूंत २३ चौकार व ८ षटकारांसह २०५ धावांवर रन आऊट होऊन माघारी परतली. कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या युवा महिला क्रिकेटपटूंमध्ये शफालीने ( २० वर्ष व १५२ दिवस) दुसरे स्थान पटकावले. भारताची मिलाती राज ( १९ वर्ष व २५४ दिवस वि. इंग्लंड, २००२) या विक्रमात अव्वल आहे.
शफालीने महिला कसोटी क्रिकेटमध्ये १९४ चेंडूंत वेगवान द्विशतक झळकावले. हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडच्या ( २५६ चेंडू वि. दक्षिण आफ्रिका, २०२४) नावावर होता. शेफाली व स्मृती यांच्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी चांगली फटकेबाजी केली. जेमिमाने ९४ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. हरमनप्रीत ७६ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने ४२ धावांवर, तर रिचा घोष ३३ चेंडूंत ९ चौकारांसह ४३ धावांवर नाबाद आहे. भारतीय महिला संघाने कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद ५२५ धावा केल्या.