IND Women vs SA Women Test : वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय महिला संघाने कसोटीतही दक्षिण आफ्रिकेची अवस्था वाईट केली. शफाली वर्मा ( Shafali Verma double hundred ) आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी २९२ धावांची विक्रमी भागीदारी केली. वन डे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या स्मृतीने १६१ चेंडूंत २७ चौकार व १ षटकारासह १४९ धावा केल्या. ५२व्या षटकात डेलमी टकरने भारताला पहिला धक्का दिला. पण, शफाली कोणाला जुमानत नव्हती आणि तिने द्विशतक झळकावून इतिहास घडवला. कसोटीत क्रिकेटमध्ये मिताली राजनंतर द्विशतक झळकावणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. शफाली १९७ चेंडूंत २३ चौकार व ८ षटकारांसह २०५ धावांवर रन आऊट होऊन माघारी परतली, परंतु तिने अनेक विक्रम मोडले.
शफाली व स्मृती यांनी महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम २९२ धावांची विक्रमी भागीदारी केली.
कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या युवा महिला क्रिकेटपटूंमध्ये शफालीने ( २० वर्ष व १५२ दिवस) दुसरे स्थान पटकावले. भारताची मिलाती राज ( १९ वर्ष व २५४ दिवस वि. इंग्लंड, २००२) या विक्रमात अव्वल आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडने ( २२ वर्ष व १२६ दिवस) २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावले होते आणि शफालीने तिला आज मागे टाकले.
शफाली कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी दुसरी युवा भारतीय फलंदाज ठरली. तिने विनोद कांबळीचा ( २१ वर्ष व ३२ दिवस) १९९३ साली इंग्लंडविरुद्ध नोंदवलेला विक्रम मोडला. सुनील गावस्कर यांनी १९७१ मध्ये २१ वर्ष व २७७ दिवसांचे असताना वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतक झळकावले होते आणि शफालीने त्यांचाही विक्रम मोडला.
चेन्नईत कसोटी क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग ( वि. दक्षिण आफ्रिका, २००८) याच्यानंतर द्विशतक झळकावणारी शफाली दुसरी भारतीय ओपनर ठरली. द्विशतकानंतर रन आऊट होणारी शफाली ही तिसरी भारतीय ( संजय मांजरेकर वि. पाकिस्तान, १९८९ आणि राहुल द्रविड वि. इंग्लंड, २००२) ठरली.
Web Title: IND Women vs SA Women Test : Shafali Verma becomes the second Indian woman after Mithali to score a double century in women's Test cricket, break Vinod Kambli record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.