IND Women vs SA Women Test : वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय महिला संघाने कसोटीतही दक्षिण आफ्रिकेची अवस्था वाईट केली. शफाली वर्मा ( Shafali Verma double hundred ) आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी २९२ धावांची विक्रमी भागीदारी केली. वन डे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या स्मृतीने १६१ चेंडूंत २७ चौकार व १ षटकारासह १४९ धावा केल्या. ५२व्या षटकात डेलमी टकरने भारताला पहिला धक्का दिला. पण, शफाली कोणाला जुमानत नव्हती आणि तिने द्विशतक झळकावून इतिहास घडवला. कसोटीत क्रिकेटमध्ये मिताली राजनंतर द्विशतक झळकावणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. शफाली १९७ चेंडूंत २३ चौकार व ८ षटकारांसह २०५ धावांवर रन आऊट होऊन माघारी परतली, परंतु तिने अनेक विक्रम मोडले.
शफाली कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी दुसरी युवा भारतीय फलंदाज ठरली. तिने विनोद कांबळीचा ( २१ वर्ष व ३२ दिवस) १९९३ साली इंग्लंडविरुद्ध नोंदवलेला विक्रम मोडला. सुनील गावस्कर यांनी १९७१ मध्ये २१ वर्ष व २७७ दिवसांचे असताना वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतक झळकावले होते आणि शफालीने त्यांचाही विक्रम मोडला.