नवी दिल्ली : सध्या भारत अ आणि बांगलादेश अ (INDA vs BANA) यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागला नाही. बांगलादेशकडून मोसाद्देक हुसेनने सर्वाधिक 88 चेंडूत 63 धावांची खेळी केली. तर नजमुल हुसेन शांतो याला 19 धावा करण्यात यश आले आणि तैजुल इस्लामला 12 धावा करता आल्या. याशिवाय कोणत्याच बांगलादेशच्या फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही. बांगलादेशच्या धरतीवर भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाचा चांगलाच समाचार घेतला.
भारताच्या युवा ब्रिगेडने बांगलादेशला लोळवलंदरम्यान, भारताकडून सौरभ कुमारने सर्वाधिक 4 बळी पटकावले, तर नवदीप सैनीला 3 बळी घेण्यात यश आले. याशिवाय मुकेश कुमारने 2 बळी घेतले तर अतित शेठने 1 बळी घेत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच शानदार गोलंदाजी करून यजमान संघाच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. खरं तर बांगलादेशचा संघ आपल्या पहिल्या डावात 45 षटकांत केवळ 112 धावा करू शकला आणि सर्वबाद झाला. बांगलादेशला स्वस्तात सर्वबाद केल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी आला आहे. संघाचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि अभिमन्यू इसवरन अर्धशतकी खेळी करून खेळपट्टीवर टिकून आहेत. 30 षटकांपर्यंत भारतीय संघाची धावसंख्या 106 झाली आहे. तर यशस्वी जैस्वाल 86 चेंडूत 50 धावांवर आणि अभिमन्यू इसवरन 95 चेंडूत 50 धावांवर खेळत आहे.
कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, अभिमन्यू इसवरन (कर्णधार), टिलक वर्मा, उपेंद्र यादव, यश धुल, जयंत यादव, मुकेश कुमार, अतित शेठ, राहुल चहर, नवदीप सैनी, सौरभ कुमार, रोहन कुन्नम्मल.
कसोटी सामन्यासाठी बांगलादेशचा संघ - महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, मोमिनुल हक, मोहम्मद मिथुन (कर्णधार), मोसाद्देक हुसेन, जाकेर अली, नईम हसन, रेजौर रहमान राजा, खालेद अहमद, तैजुल इस्लाम.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"