INDA vs BANA Live ACC Men's Emerging Cup : भारत-पाकिस्तान यांच्यात इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेची फायनल होणार आहे. भारत अ संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेश अ संघावर दणदणीत विजयाची नोंद करताना फायनलमध्ये धडक मारली. जेतेपदाच्या सामन्यात २३ जुलैला भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. कर्णधार यश धुलच्या दमदार फलंदाजीनंतर निशांत सिंधूने ५ विकेट्स घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान अ संघाने ६० धावांनी श्रीलंका अ संघावर विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने ४९.१ षटकांत सर्वबाद २११ धावा केल्या. कर्णधार यश धुल वगळता (६६) कोणत्याच भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावणारा साई सुदर्शन ( २१) ला देखील काही खास कामगिरी करता आली नाही. अभिषेक शर्मा (३४), निकिन जोस (१७), निशांत सिंधू (५), रियान पराग (१२), ध्रुव झरेल (१), हर्षित राणा (९), मानव सुथार (२१), राजवर्धन हंगर्गेकरला (१५) धावा करण्यात यश आले. बांगलादेशकडून मेहदी हसन (२), तनझीम साकिब (२), रकिबुल हसन (२), रिपोन मोंडोल (१) आणि सैफ्य हसन (१), सौम्य सरकारला (१) बळी घेण्यात यश आले.
मोहम्मद नईम आणि तांझिद हसन या सलामीवीरांनी बांगलादेशला सकारात्मक सुरूवात करून दिली. दोघांची ७० धावांची भागीदारी मानव सुतारने तोडली. त्याने नईमला ३८ धावांवर बाद केले. जाकिर हसन ( ५), सौम्या सरकार ( ५), अकबर अली ( २) यांनाही भारतीय गोलंदाजांनी झटपट माघारी पाठवले. कर्णधार सैफ हसनला २२ धावांवर अभिषेक शर्माने बाद करून मोठा धक्का दिला. तांझिद हसन ५१ धावांवर बाद झाल्याने बांगलादेशचा संघ अडचणीत सापडला. त्यात निशांत सिंधूने ३२ व्या षटकात सलग दोन विकेट्स घेताना बांगलादेशची अवस्था ८ बाद १५४ अशी केली आणि भारताचा विजय जवळपास पक्का केला. मानव सुतारने सामन्यातील तिसरी विकेट घेत बांगलादेशचा संपूर्ण संघ ३४.२ षटकांत १६० धावांत तंबूत पाठवला. भारताने ५१ धावांनी हा सामना जिंकला.