Ruturaj Gaikwad missed out on a twin centuries in India A vs New Zealand A - भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दमदार खेळ केला. पहिल्या डावात १२७ चेंडूंत १०८ धावा केल्यानंतर ऋतुराजची बॅट दुसऱ्या डावातही चांगलीच तळपली. भारत अ संघाने पहिल्या डावात २९३ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २३७ धावांवर गुंडाळला. दुसऱ्या डावात २४० धावा करून भारताने आतापर्यंत २९६ धावांची आघाडी घेतली आणि त्यात ऋतुराजचा सिंहाचा वाटा आहे.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बाद ६६ अशी अवस्था असताना ऋतुराजने सामन्याची सूत्रे हाती घेतली. ऋतुराज १२७ चेंडूंत १०८ धावा करून माघारी परतला. त्याने १२ चौकार व २ षटकार खेचून १४ चेंडूंत ६० धावांचा पाऊस पाडला. पण, भारताचा संपूर्ण संघ २९३ धावांत माघारी परतला. सौरव कुमार ( ४-४८), राहुल चहर ( ३-५३) व मुकेश कुमार ( २-४८) यांच्या गोलंदाजीसमोर किवी संघ २३७ धावांवर गडगडला. त्यांच्या मार्क चॅपमॅ ( ९२) व सीन सोलिया ( ५४) यांनी संघर्ष केला.
दुसऱ्या डावात अभिमन्यू इस्वरन ४ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार प्रियांक पांचाळ व ऋतुराजने १२२ धावांची भागीदारी केली. प्रियांक ६२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर ऋतुराजने तिसऱ्या विकेटसाठी रजत पाटीदारसह शतकी भागीदारी केली. शतकापासून ६ धावा दूर असताना ऋतुराजची विकेट पडली. दुसऱ्या डावात त्याने १६४ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ९४ धावा केल्या. या सामन्यात त्याने एकूण २०२ ( १०८ - ९४) धावा केल्या. रजत ६९ धावांवर खेळतोय आणि भारताच्या ३ बाद २४१ धावा झाल्या आहेत.