India A vs Pakistan A, ACC Men's Emerging Cup Final : पाकिस्तान अ संघाने प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघासमोर Emerging Cup Finalमध्ये विजयासाठी ३५३ धावांचे लक्ष्य ठेवले. २०१३ नंतर भारतीय संघाला ही स्पर्धा जिंकण्याची सुवर्णसंधी आहे, परंतु सर्व पाकिस्तानला हवं तसं घडतंय... भारताची आघाडीचे दोन फलंदाज अम्पायरच्या कृपेने पाकिस्तानला ढापता आले आहेत.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानला सलामीवीर सैय आयूब ( ५९) व साहिबजादा फरहान ( ६५) यांनी चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनी १७.२ षटकांत फलकावर १२१ धावा चढवल्या अन् मानव सुतारने पहिला धक्का दिला. आयूब माघारी परतल्यानंतर ओमैर युसूफने ( ३५) चांगला खेळ केला, परंतु फरहान रन आऊट झाल्याने डाव फिस्कटला. तय्यब ताहीरने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावताना शतक ठोकले. त्याने ७१ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह १०८ धावांची खेळी करून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. मुबसीर खानने ३५ धावांचे योगदान दिले. रियान पराग, राजवर्धन हंगर्गेकर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
साई सुदर्शन व अभिषेक शर्मा यांनी आक्रमक सुरुवात करताना ८.३ षटकांत ६४ धावा फलकावर चढवल्या. अर्शद इक्बालच्या गोलंदाजीवर सुदर्शन ( २९) झेलबाद झाला, परंतु हा चेंडू No Ball असल्याचे स्पष्ट दिसत होते. इक्बालचा पाय क्रिजच्या पुढे पडल्याचे दिसत होते आणि अम्पायरच्या चुकीमुळे भारताला हा फटका बसला. निकिन जोस ( ११) याचीही विकेट अम्पायरने ढापली. मोहम्मद वासीमच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक मोहम्मद हॅरीसने झेल घेतला, परंतु चेंडू अन् जोसच्या बॅटचा काहीच संपर्क झालेला नव्हता. अम्पायरच्या या चुकांमुळे भारताचे दोन फलंदाज ८० धावांवर माघारी परतले.