India A vs Pakistan A, ACC Men's Emerging Cup Final : भारत वि. बांगलादेश या महिलांच्या वन डे सामन्यांत कर्णधार हरमनप्रीत कौरनेही अम्पायरच्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. हे प्रकरण ताजे असताना भारत अ संघाला Emerging Cup Final मध्येही हाच अनुभव आला. पाकिस्तान अ संघाने Emerging Cup Finalमध्ये भारत अ संघावर विजय मिळवला. अम्पायरच्या सुरुवातीच्या दोन चुकीच्या निर्णयामुळे भारताचे दोन फलंदाज माघारी परतले. तिथे भारतीय संघावर दडपण वाढले आणि भारताला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले.
IND vs PAK : 'अम्पायर' कृपेने पाकिस्तानला २ विकेट्स मिळाल्या; भारतीय फलंदाजांवर अन्याय झाला
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानला सलामीवीर सैय आयूब ( ५९) व साहिबजादा फरहान ( ६५) यांनी चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनी १७.२ षटकांत फलकावर १२१ धावा चढवल्या अन् मानव सुतारने पहिला धक्का दिला. आयूब माघारी परतल्यानंतर ओमैर युसूफने ( ३५) चांगला खेळ केला, परंतु फरहान रन आऊट झाल्याने डाव फिस्कटला. तय्यब ताहीरने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावताना शतक ठोकले. त्याने ७१ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह १०८ धावांची खेळी करून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. मुबसीर खानने ३५ धावांचे योगदान दिले. साई सुदर्शन व अभिषेक शर्मा यांनी आक्रमक सुरुवात करताना ८.३ षटकांत ६४ धावा फलकावर चढवल्या. अर्शद इक्बालच्या गोलंदाजीवर सुदर्शन ( २९) झेलबाद झाला, परंतु हा चेंडू No Ball असल्याचे स्पष्ट दिसत होते. निकिन जोस ( ११) याचीही विकेट अम्पायरने ढापली. मोहम्मद वासीमच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक मोहम्मद हॅरीसने झेल घेतला, परंतु चेंडू अन् जोसच्या बॅटचा काहीच संपर्क झालेला नव्हता. अभिषेक शर्मा व कर्णधार यश धुल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अभिषेकने ( ६१) अर्धशतकी खेळी केली, परंतु सुफियान मकिमच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. निशांत सिंधूही ( १०) लगेच माघारी परतला.
ज्यावर सर्व भिस्त होती, तो यश धुलही पुढच्या षटकात झेलबाद झाला. सुफियान मुकीमने ३९ धावांची खेळी करणाऱ्या यशला बाद केले अन् भारताचा निम्मा संघ १५९ धावांत तंबूत परतला. इथून भारताचा डाव गडगडला. ध्रुव जुरेल ( ९), रियान पराग ( १४) व हर्षिल राणा ( १३) झटपट माघारी परतले. मेहरान मुमताझने यापैकी दोन विकेट्स घेतल्या, तर मुकीमने हर्षितला बाद केले. राजवर्धन हंगर्गेकरने ( ११) थोडा संघर्ष दाखवला, परंतु अर्शद इक्बालने त्याला बाद केला. भारताचा संपूर्ण संघ ४० षटकांत २२४ धावांवर तंबूत परतला. पाकिस्तानने १२८ धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा हा चषक उंचावला.