तिरुअनंतपुरम : भारत अ संघाने गुरुवारी झालेल्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात 47 षटकांत 6 बाद 327 धावांचा डोंगर उभा केला. मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशानंतर मुंबईकर शिवम दुबेने सातव्या विकेटसाठी अक्षर पटेलला सोबतीला घेऊन नाबाद 121 धावांची भागीदारी केली. शिवम व अक्षर या जोडीनं 11.1 षटकांत 10.83 च्या सरासरीनं फटकेबाजी केली.
सलामीवर रुतुराज गायकवाड आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, गायकवाड 10 धावा करून माघारी परतला. गिलने 47 चेंडूंत 7 चौकारासह 46 धावा केल्या, परंतु त्याला मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. अनमोलप्रीत सिंग ( 29), कर्णधार मनिष पांडे ( 39), इशान किशन ( 37) यांनी छोटेखानी खेळी केल्या. पण भारतीय संघाचा धावांचा वेग फार संथ होता.
कृणाल पांड्या माघारी परतल्यानंतर शिवम आणि अक्षर यांनी भारताच्या धावांचा वेग वाढवला. या दोघांनी तुफान फटकेबाजी करताना संघाला 327 धावांचा पल्ला गाठून दिला. शिवमने 60 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकार खेचून नाबाद 79 धावा केल्या, तर पटेलने 36 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 60 धावा चोपल्या.