भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल बार्बाडोस येथे होणार आहे. पण, त्याचवेळी उभय देशांचे महिला संघ चेन्नईत कसोटी क्रिकेट खेळत आहेत. भारतीय महिला संघाने या कसोटीत आफ्रिकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. शफाली वर्माचे द्विशतक अन् स्मृती मानधनाच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या दिवशी भारताने ५२५ धावा कुटल्या होत्या आणि या कोणत्याही संघाकडून एकाच दिवशी झालेल्या सर्वाधिक धावा होत्या. त्यात दुसऱ्या दिवशी भारताने ६ बाद ६०३ धावांवर डाव घोषित केला आणि आणखी एक विश्वविक्रम नावावर नोंदवला गेला.
शफाली वर्माने १९७ चेंडूंत २३ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने २०५ धावा केल्या, तर स्मृतीने १६१ चेंडूंत २७ चौकार व १ षटकाराच्या मदतीने १४९ धावा केल्या. या दोघिंनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी २९२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज ( ५५), कर्णधार हरमनप्रीत कौर ( ६९) आणि रिचा घोष ( ८६) यांनी अर्धशतक झळकावताना भारताला ६ बाद ६०३ धावांपर्यंत पोहोचवले. महिला क्रिकेटमध्ये प्रथमच एखाद्या संघाने ६०० हून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. याचवर्षी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ बाद ५७५ धावा करून १९९८ सालचा स्वतःचाच ( ६ बाज ५६९ वि. इंग्लंड) विक्रम मोडला होता. आज भारतीय महिला संघाने यात बाजी मारली.