संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) नेतृत्वाखाली भारत अ संघाने न्यूझीलंड अ विरुद्धची वन डे मालिका आधिक २-० अशी जिंकली आहे. त्यात आज सुरू असलेल्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारत अ संघाने २८४ धावा केल्या आहेत. शार्दूल ठाकूर, संजू व तिलक वर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारत अ संघाने ही मजल मारली. शार्दूलने अखेरच्या ५ षटकांत दमदार फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
अभिमन्यू इस्वरन व राहुल त्रिपाठी यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. राहुल २५ चेंडूंत १८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर १० धावांची भर घालून अभिमन्यू बाद झाला. त्याने ३५ चेंडूंत ८ चौकारांसह ३९ धावा केल्या. कर्णधार संजू व तिलक यांनी डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. तिलक ६२ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला. श्रीकर भरत ( ९), राजा बावा ( ४), राहुल चहर ( १) हे स्वस्तात बाद झाले. पण, संजूने ६८ चेंडूंत १ चौकार व २ षटकार खेचून ५४ धावांची खेळी केली.
रिषी धवननेही उत्तम खेळ करताना ३४ धावा केल्या. शार्दूलने अखेरच्या षटकांत वादळी खेळी करताना ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तो रन आऊट झाला. त्याने ३३ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५१ धावा चोपल्या. भारत अ संघाचा संपूर्ण डाव ४९.३ षटकांत २८४ धावांत गडगडला. न्यूझीलंड अ संघाकडून जेकॉब डफी ( २-४५), मॅथ्यू फिशर ( २- ६१) व मिचेल रिपॉर ( २-४३) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.