India A beat New Zealand A by 7 wickets - भारताच्या युवा ब्रिगेडने आज न्यूझीलंडच्या युवा ब्रिगेडला वन डे सामन्यात पराभवाची चव चाखवली. शार्दूल ठूकर व कुलदीप सेन यांच्या सुरेख गोलंदाजीनंतर ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी व कर्णधार संजू सॅमसन यांच्या फलंदाजीने बाजी मारली. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली. दुलिप करंडक स्पर्धेत वेस्ट झोनकडून उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीत शतक झळकावणारा पृथ्वी शॉ या सामन्यात अपयशी ठरली. भारतीय संघातील पुनरागमनात त्याला खेळात सातत्य राखता आले नाही.
तीन कसोटी सामन्यानंतर भारत अ व न्यूझीलंड अ यांच्यातल्या वन डे मालिकेला सुरुवात झाली. पृथ्वी शॉचे संघातील पुनरागमन आणि संजू सॅमसनकडे सोपवण्यात आलेली कर्णधारपदाची जबाबदारी याकडे सर्वांचे लक्ष होते. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्यांचे फलंदाज अपयशी ठरले. शार्दूल ठाकूर व कुलदीप सेन यांनी भन्नाट गोलंदाजी करताना किवींचे ८ फलंदाज ७४ धावांवर माघारी पाठवले. कर्णधार रॉबर्ट ओडोनेलने या ८ फलंदाजांमध्ये सर्वाधिक २२ धावा केल्या. त्यानंतर मिचल रिपॉन व जो वॉकर यांनी संघर्ष केला. रिपॉनने १०४ चेंडूंत ४ चौकारांसह ६१ धावा केल्या, तर वॉकर ३६ धावांवर रन आऊट झाला. किवींचा संघ ४०.२ षटकांत १६७ धावांत तंबूत परतला. शार्दूलने ४, कुलदीप सेनने ३ व कुलदीप यादवने १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरात पृथ्वीने आल्याआल्या षटकार खेचून हवा केली, परंतु १७ धावांवर त्याची विकेट पडली. ऋतुराज व राहुल त्रिपाठी यांनी १ बाद ३५ वरून संघाचा डाव ९१ धावांपर्यंत नेला. राहुल ४० चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला. संजू मैदानावर येताच चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतले. त्याच्या नावाचा जयघोष झाला. ऋतुराजने ५४ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४१ धावा केल्या. संजूने नाबाद २९ व रजत पाटिदारने नाबाद ४५ धावा करून भारताला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.