India A vs Bangladesh A : बांगलादेश दौऱ्यावर भारताच्या सीनियर संघाची कामगिरी अत्यंत लाजीरवाणी झाली आहे. भारताला सलग दोन सामन्यांत बांगालदेशने नमवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या या निराशाजनक कामगिरीमुळे चौफेर टीका होत असताना बांगलादेशमध्येच भारताचे ज्युनियर खेळाडू दमदार कामगिरी करत आहे. भारत अ आणि बांगलादेश अ यांच्यात चार दिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. भारत अ संघाने दुसऱ्या सामन्यात एक डाव व १२३ धावांनी विजय मिळवून मालिका १-० अशी खिशात टाकली.
बांगलादेश अ संघाचा पहिला डाव २५२ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. मुकेश कुमारने ४० धावांत ६ विकेट्स घेत बांगलादेशला धक्क्यांवर धक्के दिले. उमेश यादव ( २-५५) व जयंत यादव ( २-५६) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने डाव ९ बाद ५६२ धावांवर घोषित केला. कर्णधार अभिमन्यू ईश्वरनने आणखी एक शतकी खेळी केली. त्याने २४८ चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांसह १५७ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा ( ५२), श्रीकर भरत ( ७७) , जयंत यादव ( ८३) व सौरभ कुमार ( ५५) यांच्या अर्धशतकांनी बांगलादेशसमोर तगडे आव्हान उभे केले.
रोहितच्या जागी अभिमन्यूला मिळेल संधी...बंगालचा फलंदाज आणि सध्याच्या बांगलादेश अ दौऱ्यासाठी भारत अ संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन देखील भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रांगेत असतील. २७ वर्षीय उजव्या हाताचा सलामीवीर सध्या सुरू असलेल्या ए मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याने बॅक टू बॅक शतके ठोकली आहेत. पहिल्या सामन्यात त्याने १४१ धावांची खेळी केली आणि दुसऱ्या सामन्यात तो १५१ धावांवर बाद झाला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"