भारत 'अ' विरुद्ध ऑस्ट्रेलिया 'अ' यांच्यातील दुसरा अनौपचारिक कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाविरुद्ध मैदानातील पंचांनीच चिटिंग केल्याचा सीन पाहायला मिळाला. भारतीय खेळाडूंनी केलेल्या जोरदार अपील अन् पंचांनी दिलेला नकारात्मक प्रतिसाद यासंदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. पंचांचा निर्णय पाहून भारतीय खेळाडूही हैरान झाल्याचे या व्हिडिओत दिसून येते.
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पंचांचा निर्णय ठरला वादग्रस्त
भारत 'अ' संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया 'अ' संघ मजबूत स्थितीत आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळात मैदानातील पंचांनी ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं जो निर्णय दिला त्याचाही संघाला फायदा झाल्याचे दिसून येते. झालं असं की, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या विरोधात भारतीय खेळाडूंनी कॅच आउटचे जोरदार अपील केले. पण पंचांनी मात्र त्याला नॉट आउट दिले. हा निर्णय वादग्रस्त असल्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
तनुष कोटियन याच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्कस हॅरिस जवळपास फसलाच होता. पण त्याच्या विरोधातील कॅच आउटचा निर्णय हा भारतीय संघाच्या विरोधात गेला. मार्कस हॅरिसनं कोटियन याचा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू फर्स्ट स्लिपमध्ये असेलल्या फिल्डरच्या दिशेनं गेला. जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो पाहिल्यावर चेंडू बॅट कटसह स्लीपच्या फिल्डरकडे गेल्याचे दिसून येते. पण पंचांना मात्र तसे वाटले नाही. भारतीय खेळाडूंनी या विकेटचे सेलिब्रेशनही केले. पण मैदानातील पंच माइक ग्राहम स्मिथ यांनी दिलेल्या निर्णयावर भारतीय खेळाडूंच्या अपीलवर पाणी फेरले. हा कसोटी सामना स्थानिक स्तरावरील असल्यामुळे एल्ट्राएज किंवा हॉटस्पॉट यासारखी टेक्नोलॉजी उपलब्ध नाही. त्यामुळे पंचांचा निर्णयच अंतिम राहिला अन् भारतीय संघाला त्याचा मोठा फटकाही बसला.
पंचांचा निर्णय पाहून कमेंटेटरनंही बदलला सूर
क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात कमेंटेटर एज अँण्ड आउट ...असं म्हटल्याचंही ऐकायला येते. अंपायरच्या निर्णयानंतर कमेंटेटरनं आपला सूर बदलल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसून येते. हॅरिसनं पहिल्या डावात १३८ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. जी मॅचमधील टर्निंग पाँइंट ठरू शकते. मॅचनंतर हॅरिसनं बॅट चेंडूला नव्हे तर पॅडला लागली होती, असे म्हटले आहे. पण मुद्दा हा उरतो की, जर बॅटला स्पर्श नहोता चेंडू स्लिपपर्यंत कसा पोहचला?