AUS A vs IND A : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील भारत अ संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून सुरू होत आहे. या सामन्याच्या तोंडावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक मोठी घोषणा करत लोकेश राहुल आणि ध्रुव जुरेल यांना उर्वरीत मालिकेसाठी संधी दिली. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दुसरा सामना खेळवला जाईल. यश दयालच्या जागी अलीकडेच प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.
लोकेश राहुल मागील काही दिवसांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. राहुलबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ७५ डावात फलंदाजी केली आहे. या ७५ डावांमध्ये त्याने ३५ च्या सरासरीने २,५५१ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, अभिमन्यू ईश्वरनसाठी शेवटचा देशांतर्गत हंगाम उत्कृष्ट होता आणि जर आपण त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने १०० सामन्यांमध्ये ७,६५७ धावा केल्या आहेत, ज्यात २७ शतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ४९.४ अशी राहिली आहे. त्यामुळे लोकेश राहुलला सलामीवीर म्हणून संधी मिळते का हे पाहण्याजोगे असेल.
दुसऱ्या सामन्यासाठी भारत अ संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, इशान किशन, अभिषेक पोरेल, मुकेश कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, लोकेश राहुल, ध्रुव जुरेल.