India A vs New Zealan A : भारतीय संघाचा फ्युचर स्टार ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) याने गुरुवारी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ यांच्यातल्या तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. कर्णधार प्रियांक पांचाळ व अभिमन्य इस्वरन लगेच माघारी परल्यानंतर भारतीय संघाला मोठे धक्के बसले होते. पण, मधल्या फळीत आलेल्या ऋतुराजने किवी गोलंदाजांचा समाचार घेताना शतक झळकावले आणि भारताला पुन्हा मजबूत स्थितीत आणले.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रियांक ( ५) २०व्या षटकात बाद झाला आणि ४० धावांवर असताना भारताला पहिला धक्का बसला. पाच षटकांच्या अंतराने अभिमन्यूही ३८ धावांवर बाद झाला. २ बाद ६६ अशी अवस्था असताना ऋतुराजने सामन्याची सूत्रे हाती घेतली. त्याने रजत पाटीदारसह खेळपट्टीवर जम बसवला. ऋतुराज व रजत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावा जोडताना संघाला शंभरी पार नेले. मॅथ्यू फिशरने या डावातील दुसरी विकेट घेताना रजतला ३० धावांवर बाद केले. सर्फराज खानही खातं न उघडता फिशरच्या गोलंदाजीवर बाद झाला.
पुन्हा भारताची ४ बाद १११ अशी अवस्था झाली. पण, ऋतुराज व यष्टिरक्षक-फलंदाज उपेंद्र यादव यांनी पाचव्या विकेटसाठी १३४ धावांची मजबूत भागीदारी केली. जो वॉकरने ही भागीदारी संपुष्टात आणली. ऋतुराज १२७ चेंडूंत १०८ धावा करून माघारी परतला. त्याने १२ चौकार व २ षटकार खेचून १४ चेंडूंत ६० धावांचा पाऊस पाडला. उपेंद्र यादव ६७ धावांवर खेळतोय आणि भारताच्या ७५ षटकांत ५ बाद २५३ धावा झाल्या होत्या.
ऋतुराज बाद झाला तेव्हा भारताच्या ५ बाद २४५ धावा होत्या, परंतु त्यानंतर २९३ धावांत किवींनी यजमानांचा पहिला डाव गुंडाळला.