टीम इंडियाचा मुख्य संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. परंतू, क्रिकेटप्रेमींसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला पाहण्याची संधी चालून आली आहे. उद्याचा दिवस राखून ठेवा, पाकिस्तानची नांगी ठेचण्याची आणखी एक संधी भारतीय संघाकडे चालून आली आहे.
एसीसी मेन्स इमर्जिंग टीम्स एशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या 'ए' टीममध्ये हा सामना होणार आहे. भारतीय ए संघाचा कर्णधार यश ढुल आहे तर उपकर्णधार अभिषेक शर्मा आहे. या संघात आयपीएल संघ गुजरातचा फलंदाज साई सुदर्शन देखील आहे.
ही स्पर्धा १३ ते २३ जुलै या काळात खेळविली जात आहे. आठ आशियाई देशांमध्ये ही स्पर्धा खेळविली जात आहे. भारतीय संघाच्य़ा ग्रुपमध्ये नेपाळ, युएई आणि पाकिस्तान आहेत. भारतीय संघाने ग्रुप स्टेजमधील पहिला सामना UAE विरुद्ध खेळला होता. 8 विकेट्सने विजय मिळवला होता. तर कर्णधार ढुलने नाबाद शतक ठोकले होते. साई सुदर्शनने 41 धावा केल्या होत्या.
भारत-अ विरुद्ध पाकिस्तान-अ यांच्यात बुधवारी (19 जुलै) कोलंबोमधील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हा सामना पाहता येणार आहे. फॅनकोड अॅपवर देखील मॅच पाहता येणार आहे.