Hardik Pandya fitness (Marathi News) : भारतीय क्रिकेट निवड समिती प्रमुख अजित आगरकर दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत... रोहित शर्मासोबत ते ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहेत. आफ्रिका दौऱ्यानंतर मायदेशात अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत रोहित नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारेल अशी चर्चा आहे. २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर रोहित ट्वेंटी-२० क्रिकेट खेळलेला नाही, परंतु वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने ज्या प्रकारे नेतृत्व केले ते पाहता आगामी वर्ल्ड कप मध्येही त्यानेच ही जबाबदारी स्वीकारावी अशी अनेकांची इच्छा आहे. रोहितच्या गैरहजेरीत हार्दिकने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली होती आणि त्याच्याकडेच नेतृत्व जायला हवे असाही प्रवाह आहे. पण, हार्दिकला दुखापत झाली आणि त्याचे पुनरागमन लांबणीवर पडले. अशात रोहितचे चाहते आनंदित झाले खरे, परंतु त्यांची चिंता वाढवणारा व्हिडीओ समोर आला आहे.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या घोट्याला दुखापत झाली आणि त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतही नाही खेळला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठीही त्याची निवड केली गेली नाही.
अफगाणिस्तानविरुद्धच्या ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसह इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला. मुंबई इंडियन्सने हार्दिकला तगडी रक्कम देऊन गुजरात टायटन्सकडून ट्रेड केले आणि IPL 2024 साठी कर्णधारही बनवले. त्यामुळे रोहितचे चाहते नाराज झाले. पण, हार्दिकचे पुनरागमन लांबणीवर पडल्याने रोहित पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत दिसेल असे स्वप्न ते पाहू लागले.मात्र, भारताच्या अष्टपैलू खेळाडूने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यात तो व्यायामशाळेत कसून मेहनत घेताना दिसतोय... त्याचा फिटनेस पाहून तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतूनच पुनरागमन करेल अशी शक्यता वाढली आहे. “Progress, everyday,” अशी कॅप्शन देऊन त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.