Join us  

वॉशिंग्टन सुंदर कोरोनाबाधित; एकदिवसीय मालिकेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह

२२ वर्षीय वॉशिंग्टनला आता संघातील अन्य खेळाडूंसह रवाना होता येणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 9:46 AM

Open in App

चेन्नई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या संघातील खेळाडू बुधवारी मुंबईवरून केपटाऊनसाठी रवाना होतील. 

मात्र २२ वर्षीय वॉशिंग्टनला आता संघातील अन्य खेळाडूंसह रवाना होता येणार नाही. वॉशिंग्टन  मागील १० महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मार्च २०२१ मध्ये तो भारताकडून अखेरचा सामना खेळला होता आणि त्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेरच आहे. वॉशिंग्टनने दुखापतीतून सावरल्यानंतर विजय हजारे ट्रॉफीत तामिळनाडू संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात निवडण्यात आले. पण, आता कोरोनाबाधित झाल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन लांबणीवर पडले आहे.

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘वॉशिंग्टन दक्षिण आफ्रिकेला जाणार नाही. काही दिवसापूर्वी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला अन्य सहकाऱ्यांसोबत आफ्रिकेला रवाना होता येणार नाही.’निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी अद्याप वॉशिंग्टनच्या जागी बदली खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या एकदिवसीय संघात रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल या दोन फिरकीपटूंचा समावेश आहे. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघकोरोना वायरस बातम्या
Open in App