भारतीय संघाला 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धक्कदायक पराभव पत्करावा लागला. युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश करणाऱ्या बांगलादेशनं जेतेपद पटकावले. यशस्वी जैस्वालच्या 88 खेळीनंतरही भारताला 177 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश संघानं 42.1 षटकांत 7 बाद 170 धावा करताना डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवला. बांगलादेश संघाचे हे पहिलेच वर्ल्ड कप जेतेपद आहे. पण, या रोमहर्षक सामन्यानंतर या जंटलमन खेळाची प्रतीमा मलीन करणारा प्रकार घडला. बांगलादेशच्या खेळाडूंनी विजयाच्या उन्मादात भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की केल्याचा निंदनीय प्रकार घडला.
बांगलादेशनं नाणेफेक जिंकून टीम इंडिया प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. दिव्यांश सक्सेनाला (2) अंतिम सामन्यात अपयश आले. यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांनी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. पण, तिलक ( 38) 29व्या षटकात माघारी परतला. त्यानंतर भारताचा डाव गडगडला. कर्णधार ध्रुव जुरेल ( 22) वगळता टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांना दुहेरी धाव करता आली नाही. यशस्वी एकाबाजूनं खेळपट्टीवर तग धरून होता. त्यानं फॉर्म कायम राखताना 121 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकाराच्या मदतीनं 88 धावा केल्या. पण, तो बाद झाला आणि टीम इंडियाचा डाव 4 बाद 156 वरून सर्वबाद 177 असा गडगडला.
लक्ष्याचा पाठलाग करताना परवेझ होसैन इमोन आणि तनझीद हसन यांनी अर्धशतकी सलामी दिली. पण, रवी बिश्नोईनं सामना टीम इंडियाच्या बाजूनं झुकवला. त्यानं 10 षटकांत 3 निर्धाव षटक टाकून 30 धावांत 4 विकेट्स घेतल्या. सामना विचित्र अवस्थेत असताना बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीनं नाबाद 47 धावांची खेळी करताना भारताचा पराभव निश्चित केला. पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशसमोर 46 षटकांत 170 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते.
पहिल्यावहिल्या वर्ल्ड कप जेतेपदामुळे बांगलादेशचे खेळाडू खूप आनंदी होते. रकिबुल हसननं विजयी धाव घेताच बांगलादेशचा संपूर्ण संघ मैदानावर धावला. त्यांनी प्रचंड जल्लोष केला आणि याच आनंदात त्यांचे खेळाडू टीम इंडियाच्या खेळाडूंशी भिडताना पाहायला मिळाले. पंचांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण मिटले, परंतु बांगलादेशच्या खेळाडूंच्या कृतीचा निषेध होत आहे.