Join us  

ICC Test Team Rankings : सलग पाचव्या वर्षी विराट कोहली अँड टीमनं केला पराक्रम; पण, न्यूझीलंडकडून धोका

ICC Men’s Test Team Rankings: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं सलग पाचव्या वर्षी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपला दबदबा कायम राखला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:52 AM

Open in App

ICC Men’s Test Team Rankings: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं सलग पाचव्या वर्षी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आपला दबदबा कायम राखला आहे. आयसीसीनं गुरुवारी जाहीर केलेल्या वार्षिक कसोटी क्रमवारीत टीम इंडियानं 121 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे, तर 120 गुणांसह न्यूझीलंडही अव्वल स्थानावर विराजमान आहे. भारतीय संघ 2017, 2018, 2019, 2020 व 2021 या सलग पाच वर्षांत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. भारतीय संघानं सातव्यांना कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान कायम राखताना कसोटीची मानाची गदा  ( Test Mace) जिंकली आहे. ऑस्ट्रेलियानं 9वेळा हा पराक्रम केला आहे.  

भारतीय संघानं एक रेटिंग गुणासह 121 गुणांची कमाई केली आहे, तर न्यूझीलंड एक गुणांनी पिछाडीवर आहे. भारतीय संघानं 2-1 अशा फरकानं ऑस्ट्रेलियावर, तर 3-1 अशा फरकानं इंग्लंडवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडनं वेस्ट इंडिज व पाकिस्तान या संघांविरुद्धच्या मालिका 2-0 अशा फरकानं जिंकल्या आहेत. मे 2020पासून खेळलेल्या सर्व सामन्यांच्या निकालातून 100 टक्के आणि त्याआधीच्या दोन वर्षांच्या निकालातील 50 टक्के या पद्धतीनं गुण देण्यात आले आहेत. इंग्लंडनं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेताना ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. त्यांनी 2017-18मध्ये ऑस्ट्रेलियावर 4-0 असा विजय मिळवला होता. 

पाकिस्तानं तीन गुणांची कमाई करताना पाचवे स्थान पटकावले आहे, तर वेस्ट इंडिजनं बांगलादेशवर 2-0 असा विजय व श्रीलंकेविरुद्ध 0-0 अशा निकालाच्या जोरावर सहाव्या स्थानी झेप घेतली. 2013नंतर ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. दक्षिण आफ्रिका सातव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडनं इंग्लंडविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकल्यास ते अव्वल स्थानी विराजमान होतील.  

टॅग्स :आयसीसीभारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड