मुंबई: भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू समजले जातात. दोन्ही देशांमध्ये राजकीय वातावरण चांगले नाही. त्यामुळे पाकिस्तानबरोबर भारताने सामना खेळू नये, अशी इच्छा काही चाहत्यांची आहे. पण आता भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार असल्याचे समोर आले आहे.
आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा ही फार जुनी स्पर्धा आहे. या स्पर्धेत आशियातील क्रिकेट संघ सहभागी होत असतात. सध्याच्या घडीला बांगलादेशमध्ये आशिया चषक खेळला जात आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान भिडणार असल्याचे बोलले जात आहे.
बांगलादेशमध्ये सध्या २३ वर्षांखालील एमर्जिंग आशिया चषक २०१९ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताने या स्पर्धेत हॉंगकाँगला पराभूत करून उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानने ओमानवर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २० नोव्हेंबरला रात्री आठ वाजता उपांत्य फेरीचा सामना शेर-ए-बांगला स्डेडियमवर खेळवण्यात येणार आहे.