India Vs South Africa Test Match, Centurion Test : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) दक्षिण आफ्रिकेविरोधात सेंच्युरियनमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. सामन्याची नाणेफेक जिंकून भारतीय संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामना सुरु होण्याआधी दोन्ही संघातील खेळाडूंनी मैदानावर दोन मिनिटं मौन बाळगलं. यामागचं कारण देखील तितकच महत्त्वाचं होतं. आपलं संपूर्ण आयुष्य वर्णभेदाविरोधात लढणारे द.आफ्रिकेचे संघर्ष नायक आणि नोबल शांती पुरस्कार विजेते डेसमंड टूटू (Desmond Tutu) यांना भारत आणि द.आफ्रिकेच्या संघानं श्रद्धांजली वाहिली. टूटू यांचं रविवारी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झालं. द.आफ्रिकेच्या खेळाडूंनी याच पार्श्वभूमीवर टूटू यांच्या सन्मानार्थ हातावर काळीपट्टी बांधून खेळण्याचा निर्णय घेतला.
डेसमंट टूटू यांना द.आफ्रिकेत रंगभेदाविरोधाचं प्रतिम म्हणू ओळखलं जातं. नेहमी विवेकाच्या बाजूनं लढा देणारे आणि अहिंसेच्या मार्गातून रंगभेदाविरोधात आवाज उठवणाऱ्या टूटू यांना १९८४ साली शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आलं होतं. तसंच २००७ साली भारत सरकारनं देखील डेसमंड यांना गांधी शांती पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून डेसमंड टूटू यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. "आर्कबिशप एमेरिटस डेसमंड टूटू जागतिक स्तरावर अगणित लोकांसाठी एक मार्गदर्शक होते. मानवता आणि समानतेवर त्यांचा नेहमी जोर राहिला आहे. त्यांच्या निधनानं अतिव दु:ख होत आहे. टूटू यांच्या सर्व जवळच्या व्यक्तींप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. देव टूटू यांच्या आत्म्याला शांती देवो", असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.