हैदराबाद - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज संध्याकाळी हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला चार विकेट्सनी पराभूत केले होते. तक दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सनी विजय मिळवला होता. त्यामुळे आजचा सामना निर्णायक ठरणार आहे.
मात्र तिसऱ्या टी-२० सामन्यावर थोडं अनिश्चिततेचं सावटही आहे. या सामन्यात पाऊस अडथळा आणण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान येथील हवामान २५ ते २७ डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तर १९ किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. ५९ टक्के ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर पावसाची शक्यता ५५ टक्के आहे. हैदराबादमध्ये संध्याकाळी ५ वाजण्याच्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकलेला संघ बिनधास्त फलंदाजी घेऊ शकतो.
येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. दोन्ही संघांकडे काही चांगले फटकेबाज फलंदाज आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या धावसंख्येची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या सामन्यात फलंदाजा आणि गोलंदाजांमध्ये चांगली लढत होण्याची शक्यता आहे. संभाव्य संघ भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार) विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविचंद्र अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव. ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कर्णधार), सीन अॅबॉट, अॅस्टर अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंगलिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्थ्यू वेड, अॅडम्स झॅम्पा.