व्हीव्हीएस लक्ष्मण
रविवारचा दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारच्या पहिल्या लढतीची ‘झेरॉक्स कॉपी’ ठरला. ॲरोन फिंचने नाणेफेक जिंकताच ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीने धडाका दाखवून भारताला सळो की पळो करून सोडले. स्टीव्ह स्मिथने पुन्हा एकदा प्रेक्षणीय खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारतीय संघाने काहीही चांगले केले नाही असेच म्हणावे लागेल.
आधीच्या पराभवातून धडा घेत यजमान संघाला कमी धावसंख्येवर रोखण्याची संधी होती, मात्र कोहलीने त्यादृष्टीने डावपेच आखले नाहीत. बुमराहकडून पहिली दोन षटक टाकून घेतल्यानंतर त्याने बदल केला. टी-२० त ठीक आहे पण वन डे मध्ये किमान चार षटके टाकू द्यायला हवीत. बुमराहला बदलल्याने ऑस्ट्रेलियाचे चांगलेच फावले. वॉर्नर आणि फिंच यांनी चांगलाच पाया मजबूत केला. सुरुवातीला भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांनी मनसोक्त फटकेबाजी केली. दोन-तीन दिवसात दोन सामन्यात अखेरच्या दहा षटकात १०० वर धावा काढण्यात त्यांना यश आले. भुवनेश्वरचा अपवाद वगळता संपूर्ण ताकदीनिशी खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजीसाठी हा चिंतेचा विषय ठरावा. अशक्य आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल. विराट आणि राहुल फलंदाजी करीत असताना फटकेबाजीचा आनंद लुटता आला. मयंक आणि धवन यांनी फार काळ फलंदाजी केली नाही पण त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या माऱ्याला बऱ्यापैकी आव्हान दिले. त्यामुळे गोलंदाजांमध्ये धडकी भरली असावी.
ही मालिका गमावली, मात्र कॅनबेरा येथे आज बुधवारी भारताने सन्मान कायम राखण्यासाठी जिंकायलाच हवे. यामुळे टी-२० मालिकेला सामोरे जाताना आत्मविश्वास उंचावलेला असेल. विराटने नाणेफेक जिंकल्यास सामन्याचा निकाल बदलला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भारताचे वन डेतील यश भुवी आणि बुमराहचा वेगवान यशस्वी मारा तसेच मधल्या फळीत फिरकी गोलंदाजांच्या कमालीवर अवलंबून असते. बुमराहने डेथ ओव्हरमध्ये काही यॉर्कर चांगलेच टाकले. तथापि त्याचा मारा येथे यशस्वी होताना दिसत नाही. याशिवाय युजवेंद्र चहलदेखील मोठ्या धावा मोजत आहे. दुसऱ्या लढतीत हार्दिक पांड्याने काही षटके गोलंदाजी केली. तो सहज नव्हता पण शैलीत थोडा बदल करीत मारा करताना त्याला पाहता आले. पांड्याला सहकाऱ्यांची तोलामोलाची साथ न मिळाल्याने यजमानांना धावडोंगर उभारण्यास मुळीच अडसर आला नाही.