दुबई : भारताचे इंग्लंड (२०१६) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे (२०१७) कसोटी सामने फिक्स असल्याचा अल जजीरा या वृत्तवाहिनीचा दावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी फेटाळला. या सामन्यांचे निकाल अनपेक्षित होते, आणि त्यांना फिक्स संबोधणे अकल्पनीय असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले.
अल जजीरा वाहिनीने २०१८ ला प्रकाशित केलेल्या ‘क्रिकेट्स मॅच फिक्सर्स’या वृत्तपटात २०१६ ला चेन्नईत इंग्लंडविरुद्धचा तसेच २०१७ ला रांची येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना फिक्स असल्याचे म्हटले होते. वाहिनीने दाखविलेल्या पाच लोकांनादेखील आयसीसीने क्लीन चिट दिली.
सट्टेबाज सुनील मुन्नवर याने दावा केला की माझा सट्टेबाजीत सहभाग राहिला असून विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील दोन कसोटी सामने आपण फिक्स केले होते. आयसीसीने चार स्वतंत्र सट्टेबाजी पथक तसेच क्रिकेट तज्ज्ञांकडून या दाव्याची चौकशी केली. या सर्वांनी सामन्यांचा निकाल अनपेक्षित असल्याचा निष्कर्ष काढून सामने फिक्स असल्याचे म्हणू शकणार नाही, असे सांगितले.