मेलबोर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान बॉक्सिंग डे कसोटीसारखा प्रतिष्ठेचा सामना प्रेक्षकांची गर्दी असलेल्या स्टेडियममध्ये खेळला जायला पाहिजे आणि व्हिक्टोरियामध्ये कोविड-१९ महामारीचे वाढते रुग्ण बघता, अधिकाऱ्यांनी सामना मेलबोर्न क्रिकेट क्लबवरून हटविण्यासाठी मागे-पुढे बघायला नको, असे मत आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलरने व्यक्त केले.
टेलर पुढे म्हणाले,‘सामन्याचे आयोजन दुसºया स्थळावर शक्य आहे. नक्कीच आॅस्ट्रेलियात जे काही घडत आहे ते बघता ख्रिसमसपर्यंत कदाचित एमसीजीमध्ये १० किंवा २० हजार लोकांना प्रवेश मिळू शकतो. पण आॅस्ट्रेलिया व भारत यांच्यासारख्या दिग्गज संघांविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी हे चांगले वाटणार नाही.’
टेलरने सांगितले की,‘पर्थमधील आॅप्टस स्टेडियममध्ये सामना होऊ शकतो किंवा प्रेक्षकांसाठी अॅडिलेड ओव्हलमध्ये आयोजन शक्य आहे. अॅडिलेडमधील चाहत्यांना भारतीयांना खेळताना बघणे आवडते.’ पश्चिम आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या (वाका) प्रमुख क्रिस्टिना मॅथ्यूज यांनी या हायप्रोफाईल कसोटी मालिकेच्या आयोजन स्थळांच्या पार्श्वभूमीवर पर्थऐवजी ब्रिस्बेनला पसंती दर्शविल्यामुळे क्रिकेट आॅस्ट्रेलियावर टीका केली होती.
टेलर यांच्या मते, वाका विराट कोहली व त्याच्या संघाचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळविण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील असेल. आॅप्टस स्टेडियममध्ये ६० हजार प्रेक्षकांची क्षमता आहे आणि एमसीजीनंतर या स्टेडियमला आॅस्ट्रेलियातील सर्वोत्तम स्थळ मानल्या जाते.’
पर्थमधील आॅप्टस स्टेडियम आणि अॅडिलेड ओव्हल या प्रतिष्ठेच्या लढतीचे यजमानपद मिळविण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. येथे कोविड-१९ ची स्थिती नियंत्रणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये व्हिक्टोरियामध्ये कोविड-१९ चे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मेलबोर्नच्या काही भागात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. - मार्क टेलर