माऊंट माऊंगानुई : विजयाच्या अश्वमेधावर स्वार झालेला राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाला आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज शनिवारी आॅस्ट्रेलियाचे तगडे आव्हान असेल. भारताचे लक्ष्य चौथ्या ऐतिहासिक जेतेपदाकडे आहे. भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांनी स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत प्रत्येकी तीनदा विजेतेपदाचा मान मिळविला आहे. त्यामुळे हा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा व अटीतटीचा होईल यात शंका नाही.
द्रविडच्या युवा ब्रिगेडला फायनल जिंकून चौथ्या जेतेपदावर मोहर उमटविण्याची मोठी संधी आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वात जेतेपद मिळाल्यास मोहम्मद कैफ(२००२), विराट कोहली(२००८) आणि उन्मुक्त चंद (२०१२) यांच्यानंतर तो चौथा यशस्वी कर्णधार बनेल.
सध्याचा फॉर्म बघता भारताचे पारडे जड वाटते. भारताने आतापर्यंत पाच सामने जिंकले असून पाकवर सर्वांत मोठा २०३ धावांनी विजय साजरा केला. पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाला देखील १०० धावांनी पराभूत केले होते. आतापर्यंतच्या विजयात सामूहिक प्रयत्नांचा वाटा राहिला. सर्वच खेळाडूंनी विजयात योगदान दिले. दुसरीकडे भारताकडून पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर आॅस्ट्रेलियाने सलग चार विजय नोंदविले आहेत.
सामना: सकाळी ६.३० पासून
उभय संघ यातून निवडणार
भारत: पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभमान गिल, मनजोत कालरा, हिमांशु राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, हार्विक देसाई, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, ईशान पोरेल, अनुकूल राय, शिवासिंग, आर्यन जुयाल, अर्शदीपसिंग आणि पंकज यादव .
आॅस्ट्रेलिया: जेसन संघा (कर्णधार), विल सदरॅन्ड, जेव्हियर बार्टलेट, मॅक्स ब्रायंट, जॅक एडवर्डस्, जॅक इव्हान्स, जेरोड फ्रीमॅन, रियॉन हॅडली, बॅक्सटर होल्ट, नाथन मॅकस्वीनी, जोनाथन मेरलो, लायड पोप, परम उप्पल, आॅस्टिन वॉ.
वेगवान गोलंदाजांमुळे संघाला बळकटी आली आहे. जेव्हा जेव्हा संघाला गरज भासली, तेव्हा तेव्हा वेगवान गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावली. ते नेहमी मी सांगेल तेव्हा गोलंदाजी करण्यात सज्ज असतात. तिन्ही वेगवान गोलंदाजांची तंदुरुस्ती उत्कृष्ट आहे. त्यांच्यामुळे संघ मजबूत बनला आहे. फलंदाजांविषयी म्हणायचे झाल्यास जर आम्ही एक तरी मोठी भागीदारी करण्यास यशस्वी ठरलो, तर नक्कीच २५०-३०० च्या आसपास धावसंख्या उभारु असा विश्वास आहे. साखळी सामन्यातही मोठ्या भागीदारीनंतर आम्ही दोन बळी झटपट गमावले. मधल्या फळीनेही संघाचा डाव चांगल्याप्रकारे सावरण्यात योगदान दिले आहे.
- पृथ्वी शॉ, कर्णधार - भारत
साखळी सामन्यात भरताविरुद्ध १०० धावांनी झालेला पराभव आमच्यासाठी महत्त्वाचा ठरत नाही. अंतिम सामना हा नेहमी वेगळाच असतो. येथे खेळपट्टी आणि वातावरण वेगळे आहे. भारतीय संघाने स्पर्धेत चांगला खेळ केला आहे, पण आम्ही सुरुवातीलाच बळी मिळवण्यात यशस्वी ठरलो तर त्यांच्यावर दडपण टाकू शकतो. या सामन्यात काहीही होऊ शकते.
- जेसन संघा, कर्णधार - आॅस्ट्रेलिया
Web Title: India, Australia tussle for fourth U-19 title win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.