बेनोनी : रोमांचक झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा केवळ एका गड्याने पराभव करत १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. रविवारी विश्वविजेतेपदची लढत रंगणार असून यासाठी कांगारूंना पाच वेळच्या विजेत्या बलाढ्य भारताविरुद्ध भिडायचे आहे. २४ धावांवर सहा बळी घेणारा टॉम स्ट्रेकर सामनावीर ठरला.
नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ४८.५ षटकांत १७९ धावांत गुंडाळले. मात्र, हे लक्ष्य पार करताना कांगारूंनाही घाम फुटला आणि त्यांनी ४९.१ षटकांत ९ बाद १८१ धावा करत बाजी मारली. अली रझाने (४/३४) अप्रतिम मारा करत कांगारूंना जखडवून ठेवले. त्याच्या भेदकतेच्या जोरावर पाकने जवळपास अंतिम फेरी गाठलीच होती; परंतु ऑस्ट्रेलियाने जबरदस्त संयम दाखवताना अखेरपर्यंत लढा देत कसाबसा विजय मिळवला. माफक धावसंख्येचा पाठलाग करताना केवळ २६ धावांत ४ बळी गमावल्याने ऑस्ट्रेलियाची बिनबान ३३ धावांवरून ४ बाद ५९ धावा, अशी घसरगुंडी उडाली; परंतु एका बाजूने खंबीरपणे टिकून राहिलेल्या सलामीवीर हॅरी डिक्सनने ७५ चेंडूंत ५ चौकारांसह ५० धावांची खेळी केली. त्याने ऑलिव्हर पीकसोबत पाचव्या गड्यासाठी ६० चेंडूंत ४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पीकने ७५ चेंडूंत ४९ धावा काढताना ३ चौकार मारले. २७ व्या षटकात उबैद शाहने डिक्सनला त्रिफळाचीत करत पाकिस्तानला मोठे यश मिळवून दिले. यानंतर पीकने किल्ला लढवला; परंतु ४२ व्या षटकात तोही बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव अडखळला. राफ मॅकमिलनने २९ चेंडूंत नाबाद १९ धावांची झुंज देत संघाला विजयी केले. त्याआधी, टॉम स्ट्रेकरच्या अचूकतेपुढे अडखळलेल्या पाकिस्तानची फलंदाजी स्वस्तात गडगडली. टॉमने २४ धावांमध्ये ६ फलंदाज गारद करत पाकिस्तानच्या फलंदाजीतील हवाच काढली. त्याने प्रमुख फलंदाजांसह तळाच्या फलंदाजांनाही तंबूची वाट दाखवत ऑस्ट्रेलियाला सामन्यावर घट्ट पकड मिळवून दिली. अझान अवैस आणि अराफत मिन्हास यांनी केलेल्या संयमी अर्धशतकी खेळीमुळे पाकिस्तानला दीडशेचा टप्पा पार करता आला.
अझानने ९१ चेंडूंत ३ चौकारांसह ५२, तर अराफतने ६१ चेंडूंत ९ चौकारांसह ५२ धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानचा अर्धा संघ ७९ धावांत गारद करत कांगारूंनी आपला दबदबा राखला. माहली बीयर्डमन, कॅलम विड्लर, राफ मॅकमिलन आणि टॉम कॅम्पबेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफलकपाकिस्तान : ४८.५ षटकांत सर्वबाद १७९ धावा (अझान अवैस ५२, अराफत मिन्हास ५२; टॉम स्ट्रेकर ६/२४) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : ४९.१ षटकांत ९ बाद १८१ धावा (हॅरी डिक्सन ५०, ऑलिव्हर पीक ४९, टॉम कॅम्पबेल २५; अली रझा ४/३४, अराफत मिन्हास २/२०.)