Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : भारतीय संघाने आठव्यांदा आशिया चषक उंचावला, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेने शरणागती पत्करली आणि त्यांचा संपूर्ण संघ १५.२ षटकांत ५० धावांवर तंबूत पाठवला. यासह भारताने २३ वर्षांपूर्वी झालेल्या अपमानाचा बदला घेतला. भारताने हे माफक लक्ष्य ६.१ षटकांत १० विकेट्स राखून पार केले.
मोहम्मद सिराजने मैदान गाजवले! मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम, नोंदवले बरेच पराक्रम
जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिल्यानंतर सिराजने कंबरडे मोडले. त्यानंतर हार्दिक पांड्याने ३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. सिराजने ७-१-२१-६ अशी अप्रतिम स्पेल टाकली. हार्दिकने ३ व जसप्रीतने १ विकेट घेतली. आशिया चषक ( वन डे ) स्पर्धेत ६ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय अन् एकंदर दुसरा गोलंदाज ठरला. श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने भारताविरुद्ध २००८ मध्ये कराची येथे १३ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या आणि आज सिराजने २१ धावांत ६ विकेट्स घेतल्या. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. श्रीलंकेविरुद्धही ही वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने पाकिस्तानच्या वकार युनिसचा १९९० मध्ये शारजा येथे नोंदवलेला ( ६-२६) विक्रम मोडला.
असा काढला वचपा...
२००० मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये श्रीलंकेने ५४ धावांवर भारताचा संपूर्ण संघ गुंडाळला होता. श्रीलंकेने ५ बाद २९९ धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात भारताचा संघ ५४ धावांत माघारी परतला होता. २३ वर्षांनंतर आणखी एका फायनलमध्ये भारताने१५.२ षटकांत श्रीलंकेला ५० धावांवर ऑल आउट केले आणि १० विकेट्स व २६३ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला.
१० विकेट्सने जिंकली मॅच... माफक लक्ष्याचा पाठलाग करायला इशान किशन व शुबमन गिल ही युवा जोडी मैदानावर आली. या दोघांनी दमदार फटकेबाजी करून ६.१ षटकांत मॅच संपवली. इशान १७ चेंडूंत २२ धावांवर नाबाद राहिला, तर गिलनेही १९ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद २७ धावा केल्या. वन डे क्रिकेटमधील ही दुसरी सर्वात कमी चेंडूंची मॅच झाली. भारत-श्रीलंकेची ही मॅच १२९ चेंडूंत संपली. २०११ मध्ये श्रीलंका वि. झिम्बाब्वे सामना १२० चेंडूंत संपला होता. वन डे फायनलमधील सर्वाधिक २६३ चेंडू राखून मिळवलेला हा मोठा विजय ठरला. वन डे फायनलमध्ये तिसऱ्यांदा एखाद्या संघाने १० विकेट्सने विजय मिळवला आहे.