Join us

परदेशात खेळायला गेला, जखमी होऊन परतला; पृथ्वी शॉ ३ महिन्यासाठी मैदानाबाहेर 

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे जवळपास ३ महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 18:47 IST

Open in App

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे जवळपास ३ महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. त्यामुळे भारताच्या २०२३-२४ पर्वातील देशांर्तग क्रिकेट स्पर्धांना त्याला मुकावे लागणआर आहे. १ ऑक्टोबरपासून राजकोट येथे इराणी चषक स्पर्धा सुरू होणार आहे. लंडन येथील वन डे चॅम्पियनशीप स्पर्धेत नॉर्थहॅम्पटनशायर क्लबचे प्रतिनिधित्व करताना डरहॅमविरुद्ध त्याला दुखापत झाली आणि स्कॅनमध्ये ही दुखापत अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर असल्याचे समोर आले. 

सुरुवातीला लंडनमधील सर्जनशी सल्लामसलत केल्यानंतर, पृथ्वी बंगळुरूमधील NCAमध्ये दुसऱ्या सल्ल्यासाठी परतला. वैद्यकीय पथक पृथ्वी शॉ याच्या उपचारासंदर्भात सर्व संभाव्य पर्याय तपासत आहे आणि शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय असण्याची शक्यता आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या अधिकाऱ्याने ESPNcricinfo ला सांगितले की ते पृथ्वी शॉबाबत वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. जानेवारीमध्ये होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेसाठी तो तयार होण्याच्या शक्यतेवर NCAच्या संपर्कात आहेत.  सध्या तरी १६ ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत तो खेळणार नाही हे निश्चित दिसते.

पृथ्वी शॉ फॉर्मात आला असतानाच त्याला दुखापत झाली आणि त्याच्यासाठी हा मोठा धक्का आहे. त्याने तेथे ४ डावात ४२९ धावा केल्या होत्या. त्याने सॉमरसेटविरुद्ध १५३ चेंडूत विक्रमी २४४ धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉ हा फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या घरच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग होता आणि त्यानंतर आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी त्याने १४ पैकी फक्त ८ सामन्यांमध्ये १०६ धावा केल्या होत्या. आयर्लंडमधील ट्वेंटी-२० तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या दुसऱ्या फळीतील संघात त्याची निवड झाली नाही.   

टॅग्स :पृथ्वी शॉभारतीय क्रिकेट संघ