भारतीय संघाचा फलंदाज शिखर धवन ( Shikhar Dhawan) याने यंदाच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याच्या ड्रिम टीममधील ५ खेळाडूंची नावं जाहीर केली. शिखर धवनचेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणे अवघड आहे, कारण शुबमन गिलने मिळालेल्या संधीचं सोनं करत आपले स्थान पक्के केले आहे. धवनने निवडलेल्या त्याच्या टीममधील ५ जणांमध्ये भारताच्या केवळ दोघांचा समावेश आहे, तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी १ खेळाडूची निवड केली आहे.
विराट कोहली ( २०११, २०१५ व २०१९) तीन वर्ल्ड कप स्पर्धा खेळला आहे आणि जागतिक क्रमवारीत तो सध्या ९व्या स्थानावर आहे. धवनने त्याच्या ड्रिम ५ खेळाडूंमध्ये विराटला पहिले स्थान दिले आहे. तो म्हणाला, माझी पहिली निवड ही विराटच असेल, यात शंकाच नाही. तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि तो खोऱ्याने धावा करतो.
रोहित शर्माने २०१५ व २०१९चा वन डे वर्ल्ड कप खेळला अन् इंग्लंडमधील मागील वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने पाच शतक झळकावून विक्रम प्रस्तापित केला होता. गब्बरच्या टीममध्ये दुसरे नाव हिटमॅनचे आहे. तो म्हणाला, रोहित हा अनुभवी खेळाडू आहे आणि त्याने आयसीसी स्पर्धा व द्विदेशीय मालिकांमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. मोठ्या स्पर्धांमधील तो खेळाडू आहे.
शिखरच्या ५ खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, अफगाणिस्तानचा राशिद खान आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आहे. स्टार्कने २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत २७ विकेट्स घेतल्या होत्या आणि यंदाची स्पर्धा तो गाजवेल असा विश्वास शिखरला आहे. राशिदने त्याच्या पहिल्याच वर्ल्ड कप ( २०१९) स्पर्धेत फक्त ६ विकेट्स घेतलेल्या, परंतु यंदा भारतात होणाऱ्या स्पर्धेत त्याचा दबदबा राहिल असे शिखरला वाटले.