INDW vs IREW T20 WC 2023: दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. भारताने आयर्लंडसमोर १५६ धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे ८.२ षटकांत २ बाद ५४ धावाच करता आल्या. पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्याने या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी विजय मिळवला.
तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने सुरूवातीपासूनच शानदार खेळी केली. मराठमोळ्या स्मृती मानधनाने शानदार खेळी करून आयर्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. स्मृतीने ५६ चेंडूत ८७ धावांची खेळी केली, ज्यामध्ये ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश राहिला. भारतीय संघाच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. संघाची धावसंख्या ६२ असताना भारताला शेफाली वर्माच्या (२४ धावा) रुपात पहिला झटका बसला.
त्यानंतर स्मृती मानधनाने डाव सावरला पण तिला साथ देत असलेली भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर १३ धावांवर बाद झाली. हरमनप्रीत आणि स्मृती यांच्यात ३८ चेंडूत ५२ धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. तर युवा खेळाडू रिचा घोषला खाते देखील उघडता आले नाही. विकेट पडण्याचे सत्र सुरूच होते पण स्मृतीने ताबडतोब खेळी करून भारताला मजबूत स्थितीत पोहचवले.
भारतीय संघाने दिलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. आयर्लंडने ८.२ षटकांत दोन गडी गमावून ५४ धावा केल्या. गॅबी लुईस २५ चेंडूत ३२ आणि कर्णधार एल डेलनी १७ चेंडूत २० धावांवर नाबाद राहिले. भारताकडून रेणुका सिंगने एक विकेट घेतली. दरम्यान, या गटातून इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. सध्या इंग्लंड ब गटातील गुणतालिकेत तीन सामन्यांत तीन विजय आणि सहा गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्मृती मानधनाने केलेली शानदार खेळी आणि भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले आहे. स्मृती मानधनाने केलेल्या ८७ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघ सेमीफायनमध्ये पोहोचू शकला, असे ट्विट जय शाह यांनी केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: india beat ireland 5 runs by duckworth method and placed in womens t 20 world cup semi finals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.