नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर अंडर-19 महिला विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारतीय महिलांनी न्यूझीलंडच्या संघाला मात देऊन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेफाली वर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने उपांत्य फेरीत 8 गडी राखून किवी संघाला पराभवाची धूळ चारली. या विजयासह भारताने अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने 108 धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग पूर्ण केला आणि फायनलचे तिकिट मिळवले. उपांत्य फेरीतील दुसरा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. यांच्यातील विजयी संघ शेफाली वर्माच्या संघासोबत फायनलचा सामना खेळेल. भारतीय संघाने 14.2 षटकांत 2 बाद 110 धावा करून मोठा विजय मिळवला.
तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर किवी फलंदाज चीतपट झाल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात आणि डावाचा शेवट देखील निराशाजनक झाला. सलामीला आलेली अन्ना ब्रोनिंग (1) आणि इम्मा mcleod (2) धावा करून बाद झाली. किवी संघाकडून जॉर्जिया प्लिमर हिने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. तर यष्टीरक्षक फलंदाज इसाबेला गेझ (26) धावा करून बाद झाली. या 2 खेळाडूंशिवाय कोणत्याच फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. अखेर किवी संघ 20 षटकांत 9 बाद केवळ 109 धावा करू शकला. भारताकडून पार्श्वरी चोप्रा हिने 4 षटकांत 20 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले. तर टिटास साधू, मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि अर्चना देवी यांना प्रत्येकी 101 बळी घेण्यात यश आले.
भारताचा फायनलमध्ये प्रवेश 108 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शानदार सुरूवात केली. मात्र, कर्णधार शेफाली वर्मा (10) स्वस्तात परतली. भारताला चौथ्या षटकांत 33 धावसंख्या असताना पहिला झटका बसला. त्यानंतर श्वेता सेहरावत आणि सौम्या तिवारी यांनी सावध खेळी करून धावसंख्या पुढे नेली. भारताची उपकर्णधार श्वेता सेहरावतने (61) अर्धशतकी खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तिने 39 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. सौम्या तिवारी सावध खेळी करून श्वेताला साथ देत होती मात्र ती (22) धावांवर अन्ना ब्रोनिंग हिची शिकार झाली आणि भारताला दुसरा झटका बसला.
दरम्यान, श्वेता सेहरावतच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने फायनलचे तिकिट मिळवले. श्वेता सेहरावत आणि सौम्या तिवारी यांच्या 62 धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. न्यूझीलंडकडून अन्ना ब्रोनिंग (2) व्यतिरिक्त कोणत्याच गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत, सौम्या तिवारी, गोंगडी त्रिशा, रिचा घोष (यष्टीरक्षक), हृषिता बासू, टिटास साधू, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वरी चोप्रा, सोनम यादव.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"