क्वालालंपूर: भारताने फिरकीपटू सोनम यादवचे चार बळी आणि जी. कामिलिनीच्या फलंदाजीच्या जोरावर १९ वर्षांखालील महिला टी-२० आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अ गटातील सामन्यात रविवारी पाकिस्तानवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
१७ वर्षीय डावखुरी फिरकीपटू सोनमने सहा धावांत चार गडी बाद करत आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्यामुळे भारताने पाकिस्तानला २० षटकांत सात बाद ६७ धावांवर रोखले. भारताने कामिलिनी हिच्या २९ चेंडूतील ४४ धावांच्या जोरावर ७.५ षटकांत एक बाद ६८ धावा करत विजय साकारला. नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानकडून केवळ कोमल खान (२४) आणि फातिमा खान (११) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.