भारताचा विश्वविक्रमी सलग १२वा विजय; सलग तिसरी टी-२० मालिका जिंकली 

श्रीलंकेचा अखेरच्या सामन्यात ६ गड्यांनी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 08:21 AM2022-02-28T08:21:02+5:302022-02-28T08:23:01+5:30

whatsapp join usJoin us
india beat sri lanka 12th world record victory won the third consecutive t20 series | भारताचा विश्वविक्रमी सलग १२वा विजय; सलग तिसरी टी-२० मालिका जिंकली 

भारताचा विश्वविक्रमी सलग १२वा विजय; सलग तिसरी टी-२० मालिका जिंकली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

धर्मशाळा : श्रेयस अय्यरने झळकावलेल्या सलग तिसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या व अखेरच्या टी-२० सामन्यामध्ये श्रीलंकेचा ६ गड्यांनी पराभव केला. यासह लंकेला ३-० असा व्हाइटवॉश देताना भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात सलग तिसरी टी-२० मालिका जिंकली. तसेच भारताने सलग १२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने जिंकण्याच्या अफगाणिस्तानच्या विश्वविक्रमाची बरोबरीही केली.

श्रीलंकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरला. लंकेला २० षटकांत ५ बाद १४६ धावांवर रोखल्यानंतर भारताने आवश्यक धावा १६.५ षटकांतच केवळ ४ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. श्रेयसने कमालीची सातत्यपूर्ण कामगिरी करताना मालिकेतील तिन्ही सामन्यांत अर्धशतक ठोकले. त्याने कर्णधार रोहित (५) आणि संजू सॅमसन (१८) अपयशी ठरल्यानंतर भारताला विजयी मार्गावर आणले. श्रेयसने ४५ चेंडूंत नाबाद ७३ धावा काढताना ९ चौकार व १ षटकार मारला. युवा दीपक हूडाने (२१) त्याला चांगली साथ दिली. व्यंकटेश अय्यर (५) पुन्हा एकदा घाई करताना बाद झाला. अनुभवी रवींद्र जडेजाने (२२*) अखेरपर्यंत नाबाद राहताना श्रेयससह भारताचा विक्रमी विजय नोंदवला.

त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा भेदक मारा करताना श्रीलंकेच्या फलंदाजीला आक्रमणापासून रोखले. भारताकडून आवेश खानने दमदार मारा करताना लंकेला अडचणीत आणले. कर्णधार दासून शनाकाने (७४*) दमदार अर्धशतक झळकावल्याने लंकेला समाधानकारक मजल मारता आली. नाणेफेक जिंकून लंकेचा कर्णधार दासून शनाकाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत सर्वांना चकित केले. पहिल्याच षटकात धक्का बसलेल्या लंकेची नवव्या षटकात ४ बाद २९ धावा अशी अवस्था झाली.

 चंदिमल (२५) आणि शनाका यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चंदिमल आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाल्याने लंकेने ६० धावांमध्ये अर्धा संघ गमावला. शनाकाने ३८ चेंडूंत नाबाद ७४ धावांचा तडाखा देत नऊ चौकार व दोन षटकार मारले. शनाका आणि चमिका करुणारत्ने (१२*) यांनी सहाव्या गड्यासाठी नाबाद ८६ धावांची भागीदारी केल्याने लंकेला समाधानकारक मजल मारता आली. अखेरच्या पाच षटकांत लंकेने ६८ धावा फटकावल्या. आवेश खानने दोन बळी घेताना आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये बळींचे खाते उघडले. मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

रोहितने दिले पाच व्हाईटवॉश

- भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांविरुद्ध सलग तीन ३-० व्हाइटवॉश नोंदवले.

-  रोहित टी-२० मालिकेत सर्वाधिक ५ व्हाइटवॉश नोंदवणारा भारतीय कर्णधार ठरला. कोहलीने २, तर महेंद्रसिंग धोनीने एक व्हाइटवॉश नोंदवला आहे.

- भारताने आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेत आठव्यांदा व्हाइटवॉश देत वर्चस्व राखले.

- भारताने घरच्या मैदानावर सर्वाधिक ४० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने जिंकले.

- तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत सलग तीन अर्धशतके ठोकणारा श्रेयस अय्यर हा विराट कोहलीनंतरचा दुसरा भारतीय ठरला.

- तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २०० हून अधिक धावा फटकावणारा श्रेयस पहिला भारतीय फलंदाज ठरला.

- रोहित दुष्मंता चमीराविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सहाव्यांदा बाद झाला. चमीरा रोहितला सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला.

संक्षिप्त धावफलक:श्रीलंका : पथुम निसांका झे. व्यंकटेश गो. आवेश १, धनुष्का गुणथिलका त्रि. गो. सिराज ०, चरिथ असलंका यष्टिचित सॅमसन गो. आवेश ४, जनिथ लियानेज त्रि. गो. बोश्नोई ९, दिनेश चंदिमल झे. अय्यर गो. हर्षल २५, दासून शनाका नाबाद ७४, चमिका करुणारत्ने नाबाद १२. अवांतर - २१. एकूण : २० षटकांत ५ बाद १४६ धावा.

बाद क्रम : १-१, २-५, ३-११, ४-२९, ५-६०.  गोलंदाजी : मोहम्मद सिराज ४-०-२२-१; आवेश खान ४-१-२३-२; हर्षल पटेल ४-०-२९-१; कुलदीप यादव ४-०-२५-०; रवि बिश्नोई ४-०-३१-१.

भारत : संजू सॅमसन झे. चंदिमल गो. करुणारत्ने १८, रोहित शर्मा झे. करुणारत्ने गो. चमीरा ५, श्रेयस अय्यर नाबाद ७३, दीपक हूडा त्रि. गो. कुमारा २१, व्यंकटेश अय्यर झे. जयविक्रमा गो. कुमारा ५, रवींद्र जडेजा नाबाद २२. अवांतर - ४.  एकूण : १६.५ षटकांत ४ बाद १४८ धावा.

बाद क्रम : १-६, २-५१, ३-८९, ४-१०३. गोलंदाजी : बिनुरा फर्नांडो ४-०-३५-०; दुष्मंता चमीरा ३-०-१९-१; लाहिरु कुमारा ३.५-०-३९-२; चमिका करुणारत्ने ३.४-०-३१-१; जेफ्री वंडेरसे २.२-०-२४-०.
 
 

Web Title: india beat sri lanka 12th world record victory won the third consecutive t20 series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.