बांगलादेश : वरिष्ठ संघापाठोपाठ भारताच्या युवा क्रिकेट संघाने आशिया ( 19 वर्षांखालील) चषक उंचावला. बांगलादेश येथे खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताच्या युवा शिलेदारांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. अंतिम सामन्यात भारताने 144 धावांनी श्रीलंकेला पराभवाची चव चाखवली. भारताच्या 304 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताचे हे सहावे युवा आशिया चषक जेतेपद आहे. भारताने 1989, 2003 ( पाकिस्तानसोबत संयुक्त), 2012, 2013-14 आणि 2016 मध्ये जेतेपद जिंकले होते.
प्रथम फलंदाजी करताना भारताने 3 बाद 304 धावांचा डोंगर उभा केला. यशस्वी जैस्वाल ( 85) आणि अनुज रावत ( 57) यांनी पहिल्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करताना संघाला दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर जैस्वाल आणि देवदत्त पडीक्कल ( 31) यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी माघारी परतल्यानंतर कर्णधार प्रभ सिमरन सिंग ( नाबाद 65) आणि आयुष बदोनी ( नाबाद 52) यांनी जोरदार फटकेबाजी केली. दोघांनी 54 चेंडूत 100 धावा कुटल्या. बदोनीने 24 चेंडूंत 50 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा निम्मा संघ 30 षटकांत 121 धावांवर माघारी परतला होता. त्यानंतर श्रीलंका संघाची पडझड सुरुच राहिली. भारताच्या हर्ष त्यागीने (6/38) सहा विकेट्स घेतल्या. श्रीलंकेकडून नवोदू दिनूश्री ( 48), निशान मदुष्का (49) आणि डॉन पसिंदू संजूला (31) यांनी संघर्ष केला.