U19 Women T20 World Cup 2025 : भारतीय महिला संघाने अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत सलग तिसरा सामना जिंकत अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक नोंदवलीये. निक्की प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीय अंडर १९ महिला संघाने साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात श्रीलंकेला ६० धावांनी पराभूत केले. या दिमाखदार विजयासह भारतीय अंडर १९ महिला संघानं सुपर सिक्समध्ये अगदी तोऱ्यात एन्ट्री मारलीये.
श्रीलंकेला फक्त ५८ धावांत रोखलं
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना गोंगाडी त्रिशाच्या ४९ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात ११८ धावा करत श्रीलंकेच्या संघासमोर ११९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं श्रीलंकेच्या संघाला ५८धावांवरच रोखले.
एका धावेनं हुकलं सलीमीची बॅटर त्रिशाचं अर्धशतक
मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे सुरु असलेल्या महिला अंडर १९ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ 'अ' गटात खेळताना दिसला. आपल्या गटातील सर्वच्या सर्व तीन संघांना शह देत भारतीय संघाने अगदी दिमाखात वर्ल्ड कप स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना गोंगाडी त्रिशा हिने संघाकडून सर्वोच्च ४९ धावांची खेळी केली. ४४ चेंडूतील या खेळीत त्रिशानं ५ चौकार अन एक षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.तिच्याशिवाय कॅप्टन निक्की प्रसाद ११( १४), मिथिला विनोद १६ (१०) आणि जोशिथानं १४ (९) दुहेरी आकडा गाठत संघाची धावसंख्या ११८ पर्यंत नेण्यासाठी बहुमूल्य योगदान दिले.
गोलंदाजीतही दमदार कामगिरीचा सिलसिला कायम
भारतीय संघाने बॅटिंगनंतर गोलंदाजीत पुन्हा एकदा आपली सर्वोच्च कामगिरी दाखवून दिली. शबनम शकील, जोथिका आणि परुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेत लंकेच्या बॅटिंग ऑर्डरला लगाम लावला. याशिवाय आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा हिने प्रत्येकी एक एक विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.