दाम्बुला, दि. 20 - श्रीलंकेनं दिलेल्या 216 धावांचा पाठलाग करताना भारतानं 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. शिखर धवनच्या शतकी खेळीमुळे भारतानं हा विजय साजरा केला आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मानं दणकेबाज खेळी करत पहिल्या विकेटसाठी 23 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर रोहित शर्माचा बळी गेला. मात्र मैदानावर आलेल्या कोहलीनं लौकिकाला साजेसा खेळ करत सामन्यावर ताबा मिळवला. धवन आणि कोहली या जोडीनं मैदानावर श्रीलंकन गोलंदाजांना नामोहरम केलं. 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारत आता 1-0नं पुढे आहे. विराट कोहलीनं 10 चौकार आणि एक षटकार लगावत 70 चेंडूंत 82 धावा केल्या होत्या. तर धवननंही जबरदस्त खेळीचं दर्शन घडवत 90 चेंडूंत 20 चौकार आणि 3 षटकार लगावत 132 धावा कुटल्या आहेत. शिखर धवननं 71 चेंडूंत 100 धावा करत शतक पूर्ण केलंय. एकदिवसीय कारकिर्दीतील शिखरचं हे 11वं शतक आहे. तत्पूर्वीच भारतानं या सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. श्रीलंकेचा सलामीवीर धनुष्का गुणथिलका युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी बळी देण्यास सुरुवात केली. फटकेबाजी करण्याच्या नादात गुणथिलकाने चहलच्या चेंडूवर लोकेश राहुलकडे झेल दिला. त्यानंतर केदार जाधवच्या चेंडूवर डिकवेल बाद झाला. डिकवेल 64 धावा काढून माघारी परतला आहे. तर अक्षर पटेलने कुशल मेंडिसला बाद करत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला. उपुल थरंगा आणि चमारा कपूगेदाराही माघारी परतला आहे. डिकवेलाने दुसऱ्या विकेटसाठी मेंडीससोबत 65 धावांची भागीदारी करत अर्धशतकही पूर्ण केलं. मात्र तो बाद झाला. श्रीलंकेचे फलंदाज मैदानावर फारशी चमक दाखवू शकले नाहीत. मोठी खेळी करण्याच्या नादात श्रीलंकेच्या फलंदाजांनी आपल्या विकेट भारतीय गोलंदाजांना बहाल केल्या. मलिंगा आणि मॅथ्यूज ही जोडी शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर राहिल्यानं श्रीलंकेनं 200 धावांचा टप्पा ओलांडला. तरीही भारतीय गोलंदाजांनी त्यांना 216 धावांवरच रोखलं. भारताकडून अक्षर पटेलने 3 बळी घेतले, त्याला केदार जाधव, जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी 2 बळी घेत भारताला चांगलं यश मिळवून दिलं. तर किमान दोन सामने जिंकून 2019मध्ये होणा-या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत चंचूप्रवेश करण्याच्या इरादा होता, मात्र तो सफल झाला नाही. 30 सप्टेंबरपूर्वी क्रमवारीत अव्वल आठ संघांमध्ये स्थान मिळवलेल्या संघांना वर्ल्ड कपच्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळेच वन-डेत दोन सामने जिंकून वर्ल्ड कपच्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवण्याच्या श्रीलंकेचा प्रयत्न असेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Ind vs SL 1st ODI : भारतानं 9 गडी राखून श्रीलंकेवर मिळवला दणदणीत विजय
Ind vs SL 1st ODI : भारतानं 9 गडी राखून श्रीलंकेवर मिळवला दणदणीत विजय
श्रीलंकेनं दिलेल्या 216 धावांचा पाठलाग करताना भारतानं 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 8:43 PM