भोपाळ : भारतीय दृष्टिहीन क्रिकेट संघाचा कर्णधार अजय रेड्डीने अष्टपैलू कामगिरी करून भारताला भोपाळमध्ये झालेल्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध २० धावांनी विजय मिळवून दिला. या विजयाबरोबरच भारताने दृष्टिहीनांसाठीच्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेमध्ये ३ - ० ने आघाडी घेत मालिका जिंकली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने अजय रेड्डीच्या नाबाद ८३ धावा आणि अन्य फलंदाजांच्या अमूल्य योगदानाच्या जोरावर २० षटकांमध्ये ५ फलंदाज गमावून २०९ धावांचे विशाल आव्हान उभे केले.
या विशाल स्कोअरचा पाठलाग करताना श्रीलंकेचे फलंदाज लवकर बाद झाले ज्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेली धावांची गती कायम ठेवण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला खूप संघर्ष करावा लागला. श्रीलंकेच्या वतीने सिल्वाने नाबाद अर्धशतक करून संघाला १८९ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली.
भोपाळमध्ये २० वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला. भारत आणि श्रीलंकेच्या दृष्टिहीन क्रिकेट संघांमधील हा सामना बीएचइएल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर झाला. या मालिकेतील चौथा सामना २० ऑक्टोबर २०१८ रोजी लुधियाना येथे होणार आहे.