१९८३ च्या विश्वविजयाने भारत ‘सुपर पॉवर’ बनला!

१९८३ चा विश्वचषकाच्या थरारक  विजयाची कथा इतकी रोमांचक तर आहेच शिवाय देशाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात संस्मरणीय घटना.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 08:06 AM2021-12-26T08:06:02+5:302021-12-26T08:06:27+5:30

whatsapp join usJoin us
India became a super power with the 1983 cricket World Cup kapil dev | १९८३ च्या विश्वविजयाने भारत ‘सुपर पॉवर’ बनला!

१९८३ च्या विश्वविजयाने भारत ‘सुपर पॉवर’ बनला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर

दिग्दर्शक कबीर खानच्या ‘८३’ या सिनेमाने देशभरात आणि सोशल मीडियावर प्रचंड वाहवा मिळविली आहे. मी अजून हा सिनेमा पाहिलेला नाही, मात्र १९८३ चा विश्वचषकाच्या थरारक  विजयाची कथा इतकी रोमांचक तर आहेच शिवाय देशाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात संस्मरणीय घटना. मी ती स्पर्धा कव्हर केली. त्यामुळे भारत जिंकावा अशी उत्सुकता होती शिवाय जिंकेल का अशी शंकाही होती. वर्तमानपत्रात संघाच्या कामगिरीला स्थान मिळेल, याबाबत साशंक होतो. 

१९७५ च्या विश्वचषकात सुनील गावसकर यांनी ६० षटकांत नाबाद ३६ धावा ठोकल्यामुळे टीका होत होती. भारत विजयाच्या शर्यतीत कुठे असे असे कुणालाही वाटत नव्हते. पत्रकार या नात्याने मी वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना कव्हरही केला नव्हता. पण मी चुकीचा ठरलो. भारताने विंडीजचा फडशा पाडला. मला आयुष्यात धडा मिळाला. व्यावसायिक पत्रकार म्हणून अंदाज चुकवू नका. क्रिकेटच्या भाषेत संकट टाळायचे असेल तर चेंडूवरील नजर हटवू नका. 

त्यानंतर भारताच्या प्रगतीचा आलेख मी अनेकदा मांडला आहेच. तथापि कपिल देव यांच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या नाबाद १७५ खेळीचा उल्लेख होणे क्रमप्राप्त ठरते. त्यांची ही खेळी स्पर्धेला नाट्यमय वळण देणारी होती. माझ्या मते, ती खेळी आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय खेळी आहे. हे एकदिवसीय क्रिकेटमधील भारतीयाचे पहिले शतक होते आणि या प्रक्रियेत कपिलने सर्वोच्च धावसंख्येचा तत्कालीन विक्रमही मोडला. काहीजण असा युक्तिवाद करू शकतात की त्यानंतरही अनेक एकदिवसीय द्विशतके झाली आहेत, मग कपिलची खेळी इतकी खास कशामुळे? ज्या परिस्थितीत या धावा केल्या गेल्या त्यामुळे... कपिल फलंदाजीला आला तेव्हा भारताने ९ धावांत चार फलंदाज गमावले होते. लवकरच ही स्थिती ५ बाद १७ अशी झाली.

अत्यंत विपरीत परिस्थितीत इतक्या महत्त्वाच्या स्पर्धेत शतक झळकावणारा कपिल हा आघाडीचा फलंदाज नव्हता, तर अष्टपैलू होता. झिम्बाब्वेविरुद्धची त्याची खेळी ढासळत्या मनोधैर्यासाठी बूस्टर डोस होती. त्यानंतर, भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून उपांत्य फेरी गाठली. नंतर बलाढ्य वेस्ट इंडिजसमोर लॉर्ड्सच्या आव्हानाची दारे उघडली.

  • २५ जून १९८३ ला १८३ धावांत बाद झाल्यानंतर कपिलच्या संघाने शानदार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासह सामन्यावर पकड मिळविली. व्हिव्ह रिचर्ड्सला बाद करणारा कपिलचा तो अप्रतिम झेल फायनलचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. रिचर्ड्स बाद होताच विंडीजची कोंडी झाली. भारताने क्रिकेट जगतात अपसेट घडविला. क्रीडा इतिहासातील ही सर्वात मोठी घटना ठरली.
  • या विजयाचा प्रभाव केवळ विश्वचषकापुरता मर्यादित राहिला नाही. भारतीय क्रिकेट महासत्ता बनण्याची उत्पत्ती या विजयात सापडते. खेळाच्या पलीकडे, जात प्रत्येक पावलावर उत्कृष्ट कामगिरीचा आत्मविश्वास आणि  आधार त्या जेतेपदाने दिला. १९८३ चा विश्वविजय भारतासाठी क्रिकेटसह अनेक बाबतीत परिवर्तनकारी ठरला.

 

Web Title: India became a super power with the 1983 cricket World Cup kapil dev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.