- रवींद्र चोपडे
नागपूर : वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकरा टाकत असलेल्या ४९व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी याने आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तुंग षटकार ठोकला आणि तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. आजच्याच दिवशी २०११ साली प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियम भारताच्या एका शानदार आणि ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार ठरला.
भारताने विश्वविजेतेपद निश्चित करताच संपूर्ण देशात दिवाळी साजरी झाली. महानायक अमिताभ बच्चनसह बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनीही मुंबईच्या रस्त्यांवर विजयाचा जल्लोष केला. आज या ऐतिहासिक विश्वविजयाला नऊ वर्षे पूर्ण झाली, मात्र आजही या सामन्याचा एक-एक चेंडू क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि महेला जयवर्धनेच्या (नाबाद १०३) दमदार शतकाच्या जोरावर त्यांनी ५० षटकांत ६ बाद २७४ धावांची आव्हानात्मक मजल मारली.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सेहवाग भोपळाही न फोडता माघारी परतला, तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर केवळ १८ धावांवर परतला. यामुळे भारताचा डाव २ बाद ३१ धावा असा अडचणीत आला होता. मात्र विराट कोहली (३५) आणि गौतम गंभीर (९७) या दिल्लीकरांनी भारताचा डाव केवळ सावरलाच नाही, तर या विश्वविजयाचा पायाही रचला. दोघांनी तिसºया गड्यासाठी ८३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
कोहली बाद झाल्यानंतर सर्वांना अपेक्षा होती, ती स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या युवराज सिंगच्या तडाखेबंद खेळीची. मात्र यावेळी मैदानात आला तो कर्णधार महेंद्रसिंग धोनी. हा एकप्रकारे जुगारच होता. कारण संपूर्ण स्पर्धेत धोनी म्हणावा तसा फॉर्ममध्ये दिसला नव्हता. त्यामुळे धोनीने घेतलेला निर्णय सर्वांनाच बुचकाळ्यात पाडणारा ठरला.
मात्र धोनीच्या त्या विजयी षटकारानंतर वानखेडे स्टेडियममधील जल्लोष अभूतपूर्व होताच, मात्र संपूर्ण देशभरातही अक्षरश: दिवाळीच साजरी झाली होती. युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना इतकेच नाही, तर ज्याने २४ वर्षे भारत देशाच्या अपेक्षांचे ओझे आपल्या खांद्यावर पेलले, त्या दिग्गज सचिन तेंडुलकरलाही आपले आनंदाश्रू रोखणे अनावर झाले होते.
यावेळी सर्वच खेळाडूंनी या दिग्गज खेळाडूला मानवंदना देताना त्याला आपल्या खांद्यावर उचलले आणि वानखेडे स्टेडियमला एक फेरी मानली. हा अप्रतिम आणि अत्यंत भावूक क्षण होता आणि नुकताच क्रीडाविश्वातील प्रतिष्ठेच्या लॉरेस पुरस्कार सोहळ्यात हा क्षण क्रीडाविश्वातील सर्वोत्तम क्षण म्हणून गौरविण्यात आला.त्यावेळी संपूर्ण भारतभर एकच जल्लोष सुरू होता. फक्त मैदानातच नव्हे, तर शहरे आणि गावा गावातही सचिन आणि धोनीच्या नावाचा जयजयकार सुरू होता. धोनीनेच भारताला दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून दिल्याची भावना सर्वांच्या मनात होती.
Web Title: India becomes world champion this day; The best moment ever given to Sachin Tendulkar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.