भारताचा २०२०-२१ सालचा ऑस्ट्रेलिया दौरा हा जगभरातील चाहत्यांच्या नेहमी लक्षात राहील. अॅडलेड कसोटीनंतर टीम इंडिया बॅकफूटवर गेली. नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला, परंतु त्यानंतर टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली जोरबार कमबॅक केले. मेलबर्न कसोटीत अजिंक्यच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियानं मालिका १-१अशी बरोबरीत आणली आणि त्यानंतर ब्रिस्बेन कसोटी जिंकून मालिका २-१ अशी खिशात घातली.
भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीचं बरंच श्रेय अजिंक्यच्या नेतृत्व कौशल्याला दिले जात आहे. अजिंक्यनं युवा गोलंदाजांचा योग्य वापर करून घेतला आणि आक्रमक क्षेत्ररक्षण लावून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले. मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, आर अश्विन हे अनुभवी गोलंदाज दुखापतींमुळे संघाबाहेर बसलेले असताना अजिंक्यनं मोहम्मद सिराज, टी नटराजन, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर या युवा गोलंदाजांना सोबत घेऊन टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
भारतीय संघाचे गोलंदाज प्रशिक्षक भरत अरूण ( Bharat Arun) यांनीही अजिंक्यच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले. ते म्हणाले,''गोलंदाजांकडून चूक झाली तरी अजिंक्य त्यांच्या पाठिशी उभा राहतो आणि त्यांचे मनोबल उंचावतो. तो एवढा शांत आहे की, गोलंदाजांना त्याची भीती वाटत नाही. ठरलेल्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यात एखादा गोलंदाज चुकला, तरी त्याला भीती वाटत नाही. याउलट विराट कोहली इतका आक्रमक आहे की तो लगेच रागावतो.''
''अजिंक्य हा शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. तो वरवर शांत स्वभावाचा दिसत असला तरी तो मनातून कणखर आहे. तो खेळाडूंच्या पाठिशी नेहमी उभा राहतो आणि त्यांच्याकडून चूक झाली तरी शांत राहतो. कर्णधार म्हणून त्याची भीती वाटत नाही. गोलंदाजांनाही हे माहीत असतं, की तो आपल्या मागे ठामपणे उभा आहे,''असेही अरुण यांनी सांगितले.
त्याच्या शांत स्वभावानं टीम इंडियाला अॅडलेड कसोटीतील मानहानिकारक पराभवातून बाहेर पडता आलं. ''विराट कोहलीच्या नेतृत्वाखील तुम्ही दोन चुकीचे चेंडू फेका, तुम्हाला त्याच्या रागाचा सामना करावा लागेल, परंतु तो त्याचा आक्रमक स्वभाव आहे. याउलट अजिंक्य शांत आहे,''असेही अरुण यांनी सांगितले.