मुंबई : आज भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेण्यात आला. बीसीसीआयच्या सल्लागार समितीने या मुलाखती घेतल्या. भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीने आज प्रशिक्षकपदासाठीच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्या आल्या. आता काही वेळातच भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण असेल, ते आपल्याला समजणार आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर, दोन व्यक्ती क्रिकेट चाहत्यांचं लक्ष्य ठरल्या होत्या. या दोघांना हटवण्याची जोरदार मोहीमच सोशल मीडियावर चालली होती. त्यापैकी एक होता कर्णधार विराट कोहली आणि दुसरी व्यक्ती होती टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री. संघ एकसंध बांधण्यात, चौथ्या क्रमांकाचा पेच सोडवण्यात आणि एकूणच निर्णयप्रक्रियेत ही जोडगोळी अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. विराटकडून कर्णधारपद रोहित शर्माकडे द्यावं आणि रवी शास्त्रींनाही 'नारळ' द्यावा, असं अनेकांचं ठाम मत होतं. परंतु, विराटचं कर्णधारपद टिकून आहे आणि संघाच्या प्रशिक्षकपदीही बहुधा शास्त्री गुरुजींचीच फेरनिवड होण्याची चिन्हं दिसताहेत. कारण, प्रशिक्षकपदासाठी जे सहा शिलेदार मैदानात आहेत, त्यात रवी शास्त्रींचं पारडं जड वाटतंय.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज सकाळी साडे दहा वाजता मुलाखती सुरू झाल्यात. भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) हेड कोचची निवड करणार आहे. या समितीत अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचाही समावेश आहे. बीसीसीआयच्या छाननीनंतर सहा शिलेदार प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उरलेत. ते आहेत, टॉम मुडी, माईक हेसन, फिल सिमन्स, लालचंद राजपूत, रॉबिन सिंग आणि रवी शास्त्री.
वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभवानंतर रवी शास्त्रींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यामुळे या पदावर ते कायम राहतात की नवा चेहरा निवडला जातो, हे आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. पण, नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पर्यंतच असणार आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. आगामी विश्वचषक हा २०२३ साली भारतामध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे २०२१ साली आता निवडण्यात आलेल्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर कदाचित पुन्हा एकदा प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेण्यात येतील आणि त्यावेळी विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून नव्या प्रशिक्षकाला संधी देण्यात येऊ शकते. त्यामुळे आता निवडवण्यात येणाऱ्या प्रशिक्षकाला ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला मार्गदर्शन करता येऊ शकते, पण तेच प्रशिक्षक संघाबरोबर २०२३च्या विश्वचषकातही असतील, हे आता सांगणे कठिण आहे.