मुंबई : आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीनंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या खेळावर टीका होत आहे. आशिया चषक स्पर्धेत धोनी अपयशी ठरला. तसेच इंग्लंड दौऱ्यातील वन डे व ट्वेंटी-20 मालिकेतही त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या धोनीला पर्याय शोधण्याचा सल्ला माजी खेळाडू देत आहेत.
माजी कसोटीपटू संजय मांजरेकरने यापूर्वीही धोनीच्या जागी संघात युवा खेळाडूला संधी देण्याचे मत व्यक्त केले होते. त्यात भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यानेही धोनीच्या बाबतित आपले मत मांडले आहे. तो म्हणाला,'' भारतीय संघाची मधली फळी संतुलित नाही. संघांने धोनीवर पहिल्यासारखे अवलंबुन राहता कामा नये. धोनीचा खेळ हा पहिल्यासारखा राहिलेला नाही. तो आता मॅच फिनिशर नाही.''
जून 2016 नंतर वर्षभर भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी पाहणारा कुंबळे पुढे म्हणाला,''2019 च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत धोनीने संघासोबत असायला हवे. मात्र संघाने त्याच्याकडून फलंदाजीत जास्त अपेक्षा बाळगायला नको. ही जबाबदारी संघातील एखाद्या युवा खेळाडूवर सोपवण्यात यावी.''