ICC Women’s ODI Player Rankings - भारतीय महिला संघाने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत ३-० असा दणदणीत विजय मिळवून आयसीसी महिला चॅम्पियनशपी सीरिजमध्ये कमाल केली. या मालिकेतील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) हिने १११ चेंडूंत नाबाद १४३ धावा केल्या. तिच्या खेळीत १८ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता. या खेळीसह हरमनप्रीतने अनेक विक्रम मोडले आणि आता ICC नेही तिच्या या खेळीची दखल घेतली आहे. आयसीसीने आज जाहीर केलेल्या महिलांच्या वन डे खेळाडू क्रमवारीत हरमनप्रीतचे प्रमोशन झाले आहे. तिने चार स्थानांच्या सुधारणेसह पाचवा क्रमांक पटकावला. ओपनर स्मृती मानधना व दीप्ती शर्मा यांनीही ताज्या क्रमावारीत आगेकूच केली आहे.
मानधनाने इंग्लंड दौऱ्यावर दोन सामन्यात ४० व ५० धवा केल्या आणि ती एक स्थानाच्या सुधारणेसह सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. ट्वेंटी-२०त फलंदाजांमध्ये मानधना दुसऱ्या क्रमांकावर आहे. दीप्ती शर्माने तिसऱ्या वन डे सामन्यात नाबाद ६८ धावांची खेळी करून विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. ती ८ स्थान वर सरकली असून २४ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. पूजा वस्त्राकर चार स्थान वर सरकून ४९व्या आणि हर्लिन देओल ८१व्या क्रमांकावर आली आहे. भारताची गोलंदाज रेणुका सिंग ७०व्या क्रमांकावरून ३५व्या क्रमांकावर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारी झुलन गोस्वामी पाचव्या क्रमांकावर आहे.
दीप्ती शर्मा खोटारडी! 'मंकडिंग' वादावर इंग्लंडची कर्णधार हिदर नाइटचा भारतीय खेळाडूवर आरोप
इंग्लंडच्या डॅनी वॅटने दुसऱ्या सामन्यात ६५ धावा केल्या होत्या आणि ती २१व्या क्रमांकावर आली आहे. एमी जोन्सही चार स्थानाच्या सुधारणेसह ३०व्या, चार्ली डीन २४ स्थानांच्या सुधारणेसह ६२व्या क्रमांकावर आली आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत ती १९व्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजची कर्णधार हायली मॅथ्यूज अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर आली आहे. तिने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ८८ धावा व ५ विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी केली.