मुंबई- भारतीय टीमचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी सध्या जास्तीत जास्त वेळ त्याच्या कुटुंबासोबत घालवतो आहे. धोनीला श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफीतूनही आराम देण्यात आला. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा धोनी यावर्षी आयपीएलमध्ये चेन्नई संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. धोनी नेहमी कार्यक्रमात जाताना पाहायला मिळतो. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात धोनीने हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात एका चाहत्याने केलेल्या कृत्यामुळे धोनी अक्षरशः भावूक झाला. एका कार्यक्रमात धोनीने हजेरी लावली होती. धोनी स्टेजवर असताना तेथे असलेल्या चाहत्यापैकी एक चाहता स्टेजवर येऊन धोनीच्या पाया पडला. त्या कार्यक्रमात धोनी त्या चाहत्याला अवॉर्ड देत होता पण चाहत्याचं लक्ष अवॉर्डकडे कमी व धोनीकडे जास्त होतं. पाया पडल्यावर त्या चाहत्याने धोनीला मिठीही मारली. धोनी भेटल्याचा आनंद त्या चाहत्याच्या चेहऱ्यावरही दिसत होता. धोनीने मोठ्या मनाने चाहत्याला उठवून मिठी मारली व त्यानंतर अवॉर्ड दिला. इतकंच नाही, तर धोनीने त्या चाहत्यासह फोटोही काढला. याआधीही चाहत्यांनी धोनीच्या पाया पडल्याच्या घटना घडल्या आहे. एका सामन्यादरम्यान धोनी बॅटिंग करत असताना एका चाहत्याने सुरक्षारक्षक असतानाही स्टेडिअममध्ये येऊन धोनीच्या पाया पडल्या होत्या. याशिवाय नेट प्रॅक्टिसच्या वेळीने चाहत्यांच्या अशा कृत्याला धोनी सामोरं गेला आहे.
धोनीने त्याच्या खेळीमुळे व कॅप्टन्सीमध्ये भारताला एका वेगळ्या स्थानी नेऊन ठेवलं आहे. भारताला दोन वेळा वर्ल्डकप मिळवून देणार धोनी हा एकमेव कॅप्टन आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात जसं धोनीचं नाव आहे तसंच चाहत्यांमध्येही त्याची क्रेझ तितकीच आहे.दरम्यान, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघातून धोनी कॅप्टन्सी करताना दिसणार आहे. गेल्यावर्षी धोनी पुण्याच्या संघातून खेळला होता पण त्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा ऑस्ट्रेलियाचा खेळाडून स्टीव स्मिथने सांभाळली होती.