शनिवारी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडले. इंग्लंडच्या धरतीवर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. यासह युनूस खानच्या नेतृत्वातील पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. भारत सिक्सर किंग युवराज सिंगच्या नेतृत्वात होता. इंडिया चॅम्पियन्सकडून अंबाती रायुडूने अंतिम सामन्यात सर्वाधिक खेळी केली, त्याने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३० चेंडूत ५० धावा कुटल्या. या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज इरफान पठाणने प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला बाद करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शेजाऱ्यांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. त्यांनी निर्धारित २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या. भारताकडून अनुरीत सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. पाकिस्तानने दिलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने १९.१ षटकांत ५ बाद १५९ धावा करून चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.
इरफान पठाणने पाकिस्तानचा कर्णधार युनूस खानचा त्रिफळा काढून जुन्या आठवणींना उजाळा दिला. १८ वर्षांपूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने कराची येथील कसोटी सामन्यात कमाल केली होती. तेव्हा इरफानने डावाच्या पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेण्याची किमया साधली होती. युनूस खानच्या रूपात इरफानला तेव्हा दुसरा बळी मिळाला. सलामीवीर सलमान बट, युनूस खान आणि त्यानंतर मोहम्मद युसूफला बाहेरचा रस्ता दाखवून इरफानने आपली हॅटट्रिक पूर्ण केली. पण, २००६ मध्ये इरफानने युनूसला एलबीडब्ल्यू बाद केले तर २०२४ मध्ये त्रिफळा काढला.
भारताचा सहज विजयअखेर कर्णधार युवराज सिंगने नाबाद १५ आणि इरफान पठाणने नाबाद ५ धावांची खेळी केली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. इरफानने विजयी चौकार लगावताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. युवराज आणि इरफान यांनी केलेला जल्लोष पाहण्याजोगा होता.