India Champions vs Pakistan Champions Final : २९ जून २०२४ रोजी भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या धरतीवर ऐतिहासिक कामगिरी करताना ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. तब्बल ११ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात टीम इंडियाला यश आले अन् तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. अशातच भारताच्या चॅम्पियन्स खेळाडूंनी आणखी एक ट्रॉफी आपल्या घरी आणली. शनिवारी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स लीग २०२४ च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडले. इंग्लंडच्या धरतीवर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. यासह युनूस खानच्या नेतृत्वातील पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. भारत सिक्सर किंग युवराज सिंगच्या नेतृत्वात होता. इंडिया चॅम्पियन्सकडून अंबाती रायुडूने अंतिम सामन्यात सर्वाधिक खेळी केली, त्याने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३० चेंडूत ५० धावा कुटल्या. या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शेजाऱ्यांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. त्यांनी निर्धारित २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या. भारताकडून अनुरीत सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. पाकिस्तानने दिलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने १९.१ षटकांत ५ बाद १५९ धावा करून चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.
दरम्यान, पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिया चॅम्पियन्सची सुरुवात चांगली झाली. रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडू यांनी पहिल्या गड्यासाठी ३४ धावांची भागीदारी केली, जी तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संपली तेव्हा उथप्पा ८ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर सुरेश रैना केवळ ४ धावा करून बाद झाला. यानंतर अंबाती रायुडू आणि गुरकीरत सिंग मान यांनी काही काळ डाव सावरला आणि त्यानंतर बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अंबाती रायुडूच्या रूपाने इंडिया चॅम्पियन्सला तिसरा धक्का बसला.
अखेर कर्णधार युवराज सिंगने नाबाद १५ आणि इरफान पठाणने नाबाद ५ धावांची खेळी केली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. इरफानने विजयी चौकार लगावताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. युवराज आणि इरफान यांनी केलेला जल्लोष पाहण्याजोगा होता.