मुंबई : टीम इंडियाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत भारताच्या पुनगरागमनाची आशा फारच कमी असल्याचं म्हटलं आहे. भारताची पुनरागमनाची शक्यता केवळ 30 टक्के आहे असं मत सेहवागने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मांडलं आहे. केपटाऊन येथे झालेल्या आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा 72 धावांनी लाजिरवाणा पराभव झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर आता भारताच्या पुनरागमनाची शक्यता केवळ 30 टक्के आहे. सेन्चुरियनमध्ये होणा-या दुस-या कसोटीसाठी परिस्थितीनुसार अश्विनला खेळवावं की नाही याबाबत भारतीय टीम व्यवस्थापनाने योग्य तो निर्णय घ्यावा. भारताने सात फलंदाज आणि चार गोलंदाजांसह दुस-या कसोटीत उतरावं, त्यामुळे अजिंक्य रहाणेला संधी मिळू शकते असं मत सेहवागने मांडलं. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूशी छेडछाड करु नका असा सल्ला 2001 मध्ये आफ्रिकेविरूद्ध कसोटी पदार्पणातच शतक झळकावणा-या सेहवागने भारतीय फलंदाजांना दिला आहे. तसंच कोहली आणि रोहित शर्माला महत्वाची भूमिका निभवावी लागेल असंही त्याने म्हटलं आहे. स्ट्रेट ड्राईव्ह किंवा फ्लिक या फटक्यांचा वापर खेळाडुंनी करावा, द. आफ्रिकेत चेंडू उसळतो. त्यामुळे बोल्ड होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे फलंदाजांनी काळजीपूर्वक खेळावं आणि किमान षटकामागे तीन धावा घेण्याचा प्रयत्न करावा असं सेहवाग म्हणाला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कसोटी मालिकेत भारताच्या पुनरागमनाची शक्यता केवळ 30 टक्के - सेहवाग
कसोटी मालिकेत भारताच्या पुनरागमनाची शक्यता केवळ 30 टक्के - सेहवाग
टीम इंडियाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत भारताच्या पुनगरागमनाची आशा फारच कमी असल्याचं म्हटलं आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 3:50 PM